हापूस आंबा आवडत नाही असा माणूस महाराष्ट्रामधे सापडणे जरा दुर्मिळच. काही चवी ज्या कायम आपल्या जिभेवर रेंगाळतात त्यापैकी एक म्हणजे हापूस आणि तो जर अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचा रसाळ पिकलेला आंबा असेल तर त्याचा बहर काही औरच.
या हापूससारखीच काही माणसे देखील पिकली की जास्त गोड होत जातात. सध्या असेच दोन रसाळ हापूस आपल्याला आनंद देत आहेत. दोघांचे प्रांत अगदी वेगळे पण कर्तृत्व मात्र एकसारखे. दोघेही आपाअपल्या क्षेत्रातील बादशहा. एक विक्रमामागून विक्रम मोडीत काढतो आहे तर दुसर्याला अशक्य शब्द जणू माहीतच नाही. दोघांच्या बरोबर उदयाला आलेले इतर तारे उल्कांप्रमाणे गळून गेले मात्र हे दोघेही अजूनही ध्रुवतार्यासारखे आसमंत उजळून टाकत आहेत. दोघांनी टीकाकारांना केवळ अजून उत्तुंग कामगिरी करूनच उत्तर दिले.
बरोबर ओळखलत मित्रांनो मी बोलतोय सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल. खरच आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला या दोघांच्या कर्तृत्वाचा आविष्कार ‘याची देही याची डोळा’ बघायला मिळाला.
सचिन बद्दल काय लिहिणार ? क्रिकेटचा जणू विश्वकोशच. सतरा वर्षाच्या कोवळ्या वयात पदार्पण करून अखंड वीस वर्ष तो क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो आहे. अमिताभ दीवार मधील देवासमोरच्या गाजलेल्या दृष्यात जसा म्हणतो “जब जब उसपे जुर्म बढे उसकी श्रद्धा बढी” तसेच जेव्हा जेव्हा त्याच्यावर टीका झाली तेव्हा तेव्हा सचिन अजून एकाग्र होऊन गोलंदाजांवर तुटून पडला. त्याच्या निवृत्तीचा घोष करणारे स्व:त निवृत्त झाले पण सचिन मात्र खेळत राहिला आणि विक्रमांचे डोंगर रचत राहिला.
अमिताभची कहाणी याच वळणावरून जाणारी. “हल्ली कोणीही येतो हीरो बनायला” असे म्हणून हिणवला गेलेला एक तरूण सगळ्यांच्या नाकावर टिच्चून शतकाचा सुपरस्टार बनला. एकसूरी, साचेबद्ध असे शिक्के बसत असताना त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एकामागोमाग एक हीट देत राहिला. राजनीतीच्या पटावरले आपले अपयश विसरून एक दमदार पुनरागमन केले आणि सतत चाकोरीबाहेरच्या भूमिका करून जुन्या टीकाकारांची तोंडे बंद केली. मोठा पडदा कमी होता की काय म्हणून छोट्या पडद्यावर सुद्धा लोकांना करोडोंची स्वप्ने वाटत राहिला. ‘घेऊ किती करांनी’ असे त्याच्या चाहत्यांना होऊन गेले.
ह्या दोघांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर बरेच साम्य आढळून येते. दोघांची आपल्या कामावर प्रचंड निष्ठा आहे. प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची तळमळ , त्यासाठी लागणारी एकाग्रता , कष्ट घेण्याची तयारी हे त्यांचे गुण प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा भरारी घेण्याचा त्यांचा स्वभाव निराशेनी ग्रासलेल्या तरुणांना मार्गदर्शक ठरावा. अंगभूत गुणांना कठोर परीश्रमाची जोड मिळाली की अशक्य असे काहीच उरत नाही हेच या दोघांनी आपल्याला दाखवून दिले आहे.
पण ह्या सर्व गुणांपेक्षा अधिक उठून दिसणार एक गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. अहंकाराचा पुसटसा रंगही त्यांच्या वर्तणूकीवर चढलेला कधी कोणी पाहिला नाही. स्व:तची टिमकी वाजवणे, इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे असे थिल्लर प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत. उलट कनिष्ठ सहकार्यांची वेळोवेळी मदतच केली आहे. म्हणूनच हे दोघे रसिकांच्या हृदयावर चिरंतन राज्य करत राहतील.
ह्या दोन सम्राटांना माझा मानाचा मुजरा !!
No comments:
Post a Comment