Thursday, October 21, 2010

तुझियासाठी

माझिया मनातील दु:खे
माझिया मनी राहू दे
तुझियासाठी मला
प्रेमगाणे गाऊ दे

असायचेच काटे जर
माझिया वाटे असू दे
तुझिया पाऊली माझी
प्रीतीपुष्पे वाहू दे

माझिया डोळ्यातील स्वप्ने
क्षणात विरूनि जाऊ दे
तुझिया स्वप्नात मला
चीरकाल रहू दे

भंगुनी हजार छकले
हृदय माझे होऊ दे
आपुली ही प्रीत मात्र
सदा अभंग रहू दे

अबोलीचा फास

सावली हलली अन् तिचा भास झाला
ग्रीष्मात क्षणभर सरींचा भास झाला

निर्जन बनात एकटाच होतो खरा
पण हृदयाला तिचा स्पर्श खास झाला

कळले नाही दोघांस कधी हळूहळू
लटका रुसवा अबोलीचा फास झाला

पुन्हा कशाला त्या आठवणी ‘आमोद’
जीवाला आता पुरेसा त्रास झाला

Tuesday, October 19, 2010

हापूस

हापूस आंबा आवडत नाही असा माणूस महाराष्ट्रामधे सापडणे जरा दुर्मिळच. काही चवी ज्या कायम आपल्या जिभेवर रेंगाळतात त्यापैकी एक म्हणजे हापूस आणि तो जर अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचा रसाळ पिकलेला आंबा असेल तर त्याचा बहर काही औरच.

या हापूससारखीच काही माणसे देखील पिकली की जास्त गोड होत जातात. सध्या असेच दोन रसाळ हापूस आपल्याला आनंद देत आहेत. दोघांचे प्रांत अगदी वेगळे पण कर्तृत्व मात्र एकसारखे. दोघेही आपाअपल्या क्षेत्रातील बादशहा. एक विक्रमामागून विक्रम मोडीत काढतो आहे तर दुसर्‍याला अशक्य शब्द जणू माहीतच नाही. दोघांच्या बरोबर उदयाला आलेले इतर तारे उल्कांप्रमाणे गळून गेले मात्र हे दोघेही अजूनही ध्रुवतार्‍यासारखे आसमंत उजळून टाकत आहेत. दोघांनी टीकाकारांना केवळ अजून उत्तुंग कामगिरी करूनच उत्तर दिले.

बरोबर ओळखलत मित्रांनो मी बोलतोय सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल. खरच आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला या दोघांच्या कर्तृत्वाचा आविष्कार ‘याची देही याची डोळा’ बघायला मिळाला.

सचिन बद्दल काय लिहिणार ? क्रिकेटचा जणू विश्वकोशच. सतरा वर्षाच्या कोवळ्या वयात पदार्पण करून अखंड वीस वर्ष तो क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो आहे. अमिताभ दीवार मधील देवासमोरच्या गाजलेल्या दृष्यात जसा म्हणतो “जब जब उसपे जुर्म बढे उसकी श्रद्धा बढी” तसेच जेव्हा जेव्हा त्याच्यावर टीका झाली तेव्हा तेव्हा सचिन अजून एकाग्र होऊन गोलंदाजांवर तुटून पडला. त्याच्या निवृत्तीचा घोष करणारे स्व:त निवृत्त झाले पण सचिन मात्र खेळत राहिला आणि विक्रमांचे डोंगर रचत राहिला.

अमिताभची कहाणी याच वळणावरून जाणारी. “हल्ली कोणीही येतो हीरो बनायला” असे म्हणून हिणवला गेलेला एक तरूण सगळ्यांच्या नाकावर टिच्चून शतकाचा सुपरस्टार बनला. एकसूरी, साचेबद्ध असे शिक्के बसत असताना त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एकामागोमाग एक हीट देत राहिला. राजनीतीच्या पटावरले आपले अपयश विसरून एक दमदार पुनरागमन केले आणि सतत चाकोरीबाहेरच्या भूमिका करून जुन्या टीकाकारांची तोंडे बंद केली. मोठा पडदा कमी होता की काय म्हणून छोट्या पडद्यावर सुद्धा लोकांना करोडोंची स्वप्ने वाटत राहिला. ‘घेऊ किती करांनी’ असे त्याच्या चाहत्यांना होऊन गेले.

ह्या दोघांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर बरेच साम्य आढळून येते. दोघांची आपल्या कामावर प्रचंड निष्ठा आहे. प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची तळमळ , त्यासाठी लागणारी एकाग्रता , कष्ट घेण्याची तयारी हे त्यांचे गुण प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा भरारी घेण्याचा त्यांचा स्वभाव निराशेनी ग्रासलेल्या तरुणांना मार्गदर्शक ठरावा. अंगभूत गुणांना कठोर परीश्रमाची जोड मिळाली की अशक्य असे काहीच उरत नाही हेच या दोघांनी आपल्याला दाखवून दिले आहे.

पण ह्या सर्व गुणांपेक्षा अधिक उठून दिसणार एक गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. अहंकाराचा पुसटसा रंगही त्यांच्या वर्तणूकीवर चढलेला कधी कोणी पाहिला नाही. स्व:तची टिमकी वाजवणे, इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे असे थिल्लर प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत. उलट कनिष्ठ सहकार्‍यांची वेळोवेळी मदतच केली आहे. म्हणूनच हे दोघे रसिकांच्या हृदयावर चिरंतन राज्य करत राहतील.

ह्या दोन सम्राटांना माझा मानाचा मुजरा !!

Thursday, October 14, 2010

उत्सव - दुसरी बाजू

काल रात्रीची घटना. वेळ रात्री १२ च्या आसपास. आम्ही सगळे दुसरी शिफ्ट संपवून घरी परत येत होतो. रेसकोर्स रस्त्यावर एक तोरण मिरवणुकीची सजावट केलेला ट्रॅक्टर चालला होता. सजावट रुंदीला बरीच मोठी असल्यामुळे जवळ जवळ सगळा रस्ता अडवला गेला होता. ट्रॅक्टर आपल्या गतीनी चालला आहे आणि त्याच्यामागे अनेक गाड्या हॉर्न वाजवत हळूहळू चालल्या आहेत असे दॄष्य होते.

आमच्या बसमधे लगेच चर्चा सुरु झाली की कसे हे उत्सव आणि ह्या मिरवणुका सामान्यांना त्रासदायक ठरतात वगैरे. सर्वांची चिडचिड चालू होती. उत्सव आणि त्याच्या सार्वजनिक स्वरूपाबद्दल आजवर बर्‍याच चर्चा झाल्या आहेत पण बर्‍याचदा त्या एकांगी असल्यासारख्या वाटतात कारण ह्या चर्चा फक्त उत्सवामुळे होणार्‍या गैरसोयींचा उहापोह करताना दिसतात. उत्सवाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय फायदे कोणी लक्षातच घेत नाही.

सर्वप्रथम आर्थिक फायदे बघु. आपल्याकडे कुठलाही उत्सव हा व्यापाराची प्रचंड मोठी संधी असते. साध्या जयंत्या साजर्‍या करण्यासाठी देखिल काही हजार रुपायांची उलाढाल होते. तर गणपती नवरात्री सारख्या मोठ्या उत्सवांमधे ती कोटींच्या घरात पोचते. असंख्य लहान मोठ्या कुटीर उद्योगांना त्यामुळे चालना मिळते. अर्थव्यवस्था खेळती राहते आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.

सामाजीक फायदे होणार्‍या गैरसोयींच्या मानाने जास्त महत्वाचे आहेत. पहिले म्हणजे नविन पिढीला आपल्या सणांची ओळख होते. उत्सव साजरे करण्यासाठी जी मंडळे, ग्रुप, ट्रस्ट बनवले जातात त्यातुन समाजातील विविध स्तरातील लोक एका मंचावर एकत्र येतात आणि सहाजीकच ऐक्याची भावना वाढते. इतर धर्माचे उत्सव साजरे करताना आपोआप धार्मिक सौदार्ह्य वाढते. वर्गणी जमवणे, मांडव घालणे, पालिकेची परवानगी काढणे, ध्वनी व्यवस्था, विविध कार्यक्रमांची व्यवस्था, जाहीरातबाजी अशा अनेक संघटनात्मक कामांमधुन कार्यकर्त्यांना परस्पर समन्वय आणि व्यवस्थापनेचे धडे मिळतात. याच कार्यकर्त्यांची नैसर्गिक आपत्ती, अपघात इ. वेळी फार मदत होते. आत्ता परवा जी ढगफुटी झाली त्यावेळी अनेक मंडळांचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धाऊन गेल्याचे आपण पाहिले. आमच्या बसमधे त्यांच्या नावानी लाखोल्या वाहणार्‍यांपैकी किती जण त्यावेळी भर पावसात अशी मदत करत होते?

राजकीय फायदा हा तर टिळकांचा उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यामागचा मूळ उद्देश होता. उत्सवाच्या माध्यमातून आपली राजकीय विचारधारा लोकांसमोर मांडता येते. आजकाल तर उत्सव मंडळ हे राजकीय कारकीर्दीची बालवाडी मानली जाते. ह्या फ्लेक्सवर झळकणार्या चेहर्‍यांमधेच आगामी काळातील आमदार, खासदार दडलेले असतात.

त्यामुळे मला वाटते की फक्त उत्सवांच्या नावाने खडे फोडून काही साध्य होणार नाही तर त्याची दुसरी बाजू पण तपासून पहायला हवी. माझ्या दॄष्टीने ह्या सर्व गैरसोयी ही भारत नामक एका अतीव सुंदर देशात राहण्यासाठी मोजलेली छोटीशी किंमत आहे.

Sunday, October 10, 2010

जातोच आहे आता

श्री. भालचंद्र देशपांडे यांनी लिहिलेले ‘अंधार इथला संपत नाही’ हे पुस्तक वाचले. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांबद्दल एका पत्रकारानी केलेले संशोधन असा विषय आहे. कथा काल्पनिक असली तरी एकदम जखडुन ठेवणारी आहे. बर्‍याच दिवसानी एका बैठकीत पुस्तक वाचुन काढले.

पुस्तक वाचल्यानंतर एका आत्महत्या करण्याच्या निर्णयाला आलेल्या शेतकर्‍याच्या दृष्टीकोनातून एक कविता लिहिली आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल.
----
गळ्याभोवती रुमालाची घट्ट त्याच्या गाठ आहे
नजर त्याची बजावते आता माझ्याशी गाठ आहे

मुजोर सत्ताधार्‍यांनी पाळलेला गुंड तो
तरीही आज माझ्यापेक्ष्या मान त्याची ताठ आहे

गरीब मुक्या जनतेचे संसार उघडे नागडे
त्याला मात्र झोपायला चंदनाची खाट आहे

सत्तेच्या खुर्चीचा एक भक्कम पाय तो
कोरडे ओढायला नेहमीच माझी पाठ आहे

जातोच आहे आता त्या जगदीशाच्या भेटीला
विचारीन त्यालाच "आमोद" किती दूर पहाट आहे

अयोध्या निकाल - जय भारत !!

सात दिवसांची अनिश्चितता एकदाची संपली. कालच्या निकालामुळे कदाचित सर्व वादी-प्रतिवादी पक्षांचे समाधान झाले नसेल पण एक गोष्ट मात्र नक्कीच अधोरेखीत झाली जी आत्तापर्यंत दोन्ही बाजूंच्या कट्टरपंथीयांकडून जाणून बुजून दुर्लक्षीत केली जात होती.

असं म्हणतात की रिकामे डोके सैतानाचे घर असते, आणि नेहमीच त्या सोबत दोन रिकामे हातही असतात. दुर्दैवाने काल पर्यंत दोन्ही बाजूचे काही स्वार्थी आणि दांभिक नेते ह्या रिकाम्या हातांना शस्त्र उचलायला भाग पाडण्यात यशस्वी ठरले होते. पण काल भारताच्या नविन पिढीने (रिकामे हात नेहमीच तरुणांचे असतात) हे दाखवून दिले आहे की आता त्यांना हातामधे शस्त्र नको तर रोजीरोटीची साधने हवी आहेत.

आज भारत इतिहासातल्या जुन्या कटू आठवणी विसरून प्रगतीच्या वाटेवर उज्वल भवितव्याकडे जाण्यासाठी अधिक उत्सुक आहे. सर्वच राजकीय आणि धार्मिक संघटनांनी ही जनभावना ओळखून त्याचा आदर करण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण जगाला काल एक समाज आणि राष्ट्र म्हणून जे परिपक्वतेचे उदाहरण भारताने दिले आहे त्याला माझा मानाचा मुजरा. जय भारत !!

दमलेल्या बाबाची कहाणी - खंत की कांगावा

संदीप खरे लिखित आणि सलिल कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गीत सध्या खूपच गाजते आहे. गीतामधला बाबा बर्‍याच जणांना आपले प्रातिनिधीक स्वरूप असल्याचा भास होतो आणि मग गाणे अजुनच हॄदय पिळवटून टाकते. गाण्यामधल्या बाबामधे जर तुम्ही खरच स्वत:ला पहात असाल तर तुम्हाला दोन प्रश्न स्वत:ला विचारलेच पाहीजेत. माझ्या कुटुंबापेक्षा माझे करीअर जास्त महत्वाचे आहे का? मी कुटुंबाबरोबर वेळ कसा व्यतित करतो? ह्या प्रश्नांच्या उत्तरामधून तुम्हाला हे उलगडेल की गाण्यामधली परिस्थीती कशी निर्माण झाली, ती अपरिहार्य होती की स्वनिर्मित. नाहीतर ही एका दमलेल्या बाबाची कहाणी न उरता एका स्वकेंद्रीत ‘करीअर’वादी बाबाचा कांगावा ठरेल.

अनेक जण असे म्हणतील की आम्ही ह्या सर्व खस्ता कुटुंबासाठीच खात असतो ना? नक्कीच, आपण सर्व आपल्या कुटुंबीयांच्या सुखासाठी झटत असतो. पण इतर भौतीक सुखांबरोबर कुटुंबीयांची एक भावनीक गरज पण असते जी केवळ आपले त्यांच्याबरोबरचे अस्तित्वच पूर्ण करु शकते. शाळेत बक्षिस समारंभाला उपस्थीत असलेल्या बाबाच्या डोळ्यातील कौतुकाची बरोबरी फोनवरच्या शुभेच्छा किंवा ग्रीटींगशी कशी करता येईल? केवळ प्रचंड पैसा, गाड्या, टी व्ही, मोबाईल कुटुंबाला उपलब्ध करुन देणे म्हणजे त्यांना सुख देणे होत नाही. ह्या सर्व सुखसुविधांचा त्यांच्या बरोबरीने उपभोग घेणेही तितकेच महत्वाचे आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये की कुटुंबसुख हे आपले साध्य आहे आणि करीअर हे साधन. पण सध्या सगळ्याच बाबतीत साध्यापेक्षा साधनाला जास्त महत्व आले आहे.

दुसरा प्रश्न मी कुटुंबीयांबरोबर वेळ कसा व्यतित करतो? तुम्ही कुटुंबाबरोबर किती वेळ व्यतित करता हे इथे विचारलेले नाही. किती पेक्षा कसा वेळ व्यतित होतो हे जास्त महत्वाचे. वेळ कोणालाच पुरत नाही, ज्यांचा वेळ पुरुन उरतो त्यांचे आयुष्य संपत आलेले असते. म्हणूनच जो वेळ आपल्याला मोकळा मिळाला आहे त्याचा आपण कसा उपयोग करतो ते बघावे. गाण्यातल्या बाबाला सुद्धा कधी ना कधी सुट्टी मिळतच असेल की ? सुट्टी नाही तर हक्काची रजा तरी तो घेऊ शकत असेल. मग अशा सुट्टीच्या दिवशी बाबा काय करतो हे फार महत्वाचे आहे. नेहमीच ऑफीसमधे मर मर मरावे लागते म्हणून बाबा सुट्टीच्या दिवशी नुसताच घरात लोळत पडणार असेल किंवा टी व्ही समोर बसून राहणार असेल तर कुटुंबीयांच्या दॄष्टीने तो अनुपस्थित असल्यासारखेच आहे. सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर पार्ट्या करायला ज्या बाबाला वेळ असतो तो आपल्या छोटीला बागेत का घेऊन जाऊ शकत नाही? टी व्ही समोर दिवस घालवणारा बाबा किती वेळा मुलांबरोबर मूल होऊन खेळतो?

कामाचा व्याप आणि कमी पडणारा वेळ हे आपण स्वतच निर्माण केलेले राक्षस तर नाहीत हे सर्व नोकरदार आई-बाबांनी तपासून पहायची वेळ आली आहे. शेवटी ‘हाऊ फार इज टू फार’ हे ज्याचे त्यालाच ठरवावे लागणार आहे.