२०११ आज संपणार. एक वर्ष संपते म्हणजे नक्की काय? काही जणांसाठी फक्त ३६५ दिवस संपले तर काही लोकांची पूर्ण जीवनयात्रा. काहींना ‘हुश्श’ झाले असेल; तर काहींना ‘का संपले?’ असे वाटत असेल. प्रत्येक वर्ष आपल्या मनावर त्याचा असा वेगळा ठसा उमटवून जाते. ह्या सरत्या वर्षानी माझ्या स्मृतीच्या वाळूवर मागे सोडलेल्या काही पाऊलखुणा.
वैयक्तीक :
- मी सिगरेट सोडली
सामाजीक - राजकीय - वैश्विक :
- ओसामा बिन लादेनचा अंत
- भारत क्रिकेटचा जगज्जेता
- भारतातले विविध घोटाळे
- जनलोकपाल आंदोलन
- शरद पवारांना मारलेली थप्पड
आर्थिक :
- वाढती महागाई आणि व्याजदर
- रोखेबाजारातील पडझड
हूरहूर :
- भीमसेन जोशी
- जगजीत सिंग
- देव आनंद
- शम्मी कपूर
Friday, December 30, 2011
Saturday, December 10, 2011
मी हजार चिंतांनी
संदीप खरेची ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’ ही कविता ऐकून मला नाही वाटत कोणी अस्वस्थ व्हायचा राहिला असेल. किती छान सोप्या शब्दात त्यानी आपल्या व्यंगावर बोट ठेवले आहे.
पण कवितेत वर्णिल्याप्रमाणे बेबंध, बेधुंद जगणे कितीही ‘रोमॅंटिक’ वाटले तरीही ‘प्रॅक्टीकल’ नक्कीच नाही हे सत्य कवितेची नशा ओसरल्यावर विदारकपणे समोर येते. ते सत्य संदीपचेच शब्द वापरून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
‘म्हणूनच’ तो कट्ट्यावर बसतो शीळ वाजवतो
आम्हासही वाटे मोकळ्या मनाने हरावे
आनंदासाठी खेळण्याच्या खेळावे
पण आम्हास नसते हरण्याची परवानगी
म्हणून आम्ही हा डाव रडीचा करतो

Saturday, November 12, 2011
उरला कोण आहे ?
जखमा उरातल्या ह्या मी दाखवू कुणाला
जिवलग असा माझा उरला कोण आहे ?
गेले ते दिन गेले की होती ओढ तुलाही
ते बंध जपणारा उरला कोण आहे ?
हात हाती गुंफुनी पाहिले स्वप्न जेव्हा
ती रात्र आठवाया उरला कोण आहे ?
एकटाच आता 'आमोद' चालला हा
देण्यास साथ त्याला उरला कोण आहे ?
जिवलग असा माझा उरला कोण आहे ?
गेले ते दिन गेले की होती ओढ तुलाही
ते बंध जपणारा उरला कोण आहे ?
हात हाती गुंफुनी पाहिले स्वप्न जेव्हा
ती रात्र आठवाया उरला कोण आहे ?
एकटाच आता 'आमोद' चालला हा
देण्यास साथ त्याला उरला कोण आहे ?
Monday, October 10, 2011
झुकी झुकी सी नजर
गेले दहा बारा दिवस जी बातमी कानावर कधीच पडू नये अशी प्रार्थना असंख्य गझलप्रेमी करत होते ती शेवटी आज आलीच. एक अद्भुत आवाज कायमचा हरपला. भारतामधील कुठल्याही गझलप्रेमी माणसाला त्याच्या आवडत्या गझल गायकांची यादी करायला सांगितली तर जगजित सिंग यांचे नाव नक्कीच पहिल्या तीनात सापडेल.
माझी गझलशी ओळख जरी गुलाम अलींच्या आवाजानी झाली असली तरी गझलचे वेड लावण्यात मोठा वाटा जगजितजींचा पण होता. कॉलेज मधे असताना किती रात्री त्यांच्या गझला ऐकत सरल्या त्याची मोजदाद करणे कठिण आहे. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर त्यांचा आवाज मनावर हळूवार फुंकर घालायचा.
आमच्या तारुण्याच्या उन्मादाची जेव्हा पालकांना धास्ती वाटायची तेव्हा आठवायचे “लोग हर मोड पे रुक रुक के संभलते क्यूँ है, इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यूँ है”, पहिल्या चुंबनाची आठवण करुन द्यायचे “लबोंसे लब जो मिल गए लबोंसे लब ही सिल गए, सवाल गुम जवाब गुम बडी हसीन रात थी” संसाराच्या रगाड्यात कुठेतरी अचानक “कागज की कश्ती” कानावर पडायचे आणि पुन्हा चिंब पावसात भिजून पाण्यात होड्या सोडाव्याशा वाटायच्या. “चंद मासूमसे पत्तोंका लहू है ‘फ़ाकिर’” ऐकल्यानंतरची घुसमट कोणाला कशी कळणार ? “अब मै राशन की कतारोंमे नजर आता हूँ” हे वास्तव “सच्ची बात कही थी मैंने” म्हणत म्हणत हाच अवलिया गालिबच्या अजब दुनियेची सैर सुद्धा करवून आणायचा.
गझलेला उच्चभ्रू दिवाणखान्यातून बाहेर काढून जनमानसात रुजवण्याचे महान काम जगजितजींनी केले. स्वतःचे वैयक्तिक दुःख विसरून दुसर्याला जगण्याची उमेद देणे हे काम फक्त देवदूतच करू शकतात. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा सुरेल आत्म्याचा संग लाभला. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही.
किती आठवणी आणि किती हळवे कोपरे आज पोरके झाले !!

Sunday, October 2, 2011
जनलोकपाल आंदोलन
जनलोकपाल आंदोलनाचा धुराळा खाली बसून आता बरेच दिवस झाले आहेत. बारा दिवसाचा एक मोठा सोहळा माध्यमांच्या ढोल ताशाच्या तालावर दणकून साजरा झाला. आता त्याचा विचार करायला ना माध्यमांना वेळ ना 'आम आदमी' ला.
माझ्यापुरता विचार करायचा झाल्यास हे आंदोलन माझ्या पिढीने पाहिलेले सर्वात मोठे जन आंदोलन होते. आम्ही अश्या आंदोनलांबद्दल फक्त इतिहासाच्या पुस्तकांमधुन वाचलेले होते आणि नकळत त्याकाळच्या लोकांबद्दल एक असुया मनात होती की त्यांना आपले नाव इतिहासात कोरायची संधी मिळाली. माझ्यामते अण्णांना तरुणाईचा जो प्रचंड पाठिंबा मिळाला त्यामागे ही सुप्त असुया एक प्रमुख कारण असु शकते.
आंदोलनाबाबत बोलायचे झाल्यास ते एक 'चळवळ' म्हणून नाही तर एक 'प्रकल्प' म्हणून राबवले गेले. एक अतिशय सुनियोजित, आखणीबंद आणि काटेकोर व्यवस्थापन असलेला प्रकल्प. अण्णांच्या त्या बारा दिवसातील प्रतिक्रीया आणि कृती पाहिल्या तर ह्या प्रकल्पाचे व्यवस्थापन किती मुरलेले होते ते स्पष्ट होईल. ह्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकांची पात्रता संशयातित नव्हतीच पण ज्यांच्या विरोधात हे आंदोलन झाले त्यांच्यापेक्षा चारित्र्यवान असल्याचा त्यांना फायदा मिळाला.
माध्यमांनी अण्णांना दुसरे गांधी म्हणून डोक्यावर घेतले आणि मी त्यांच्याशी संपूर्णपणे सहमत आहे. अण्णांकडे खरोखरच गांधीजींचे सर्व गुण आहेत. गांधीजींप्रमाणेच अण्णांचे वैयक्तिक चारित्र्य उत्तुंग पण गूढ आहे. त्यांची अंगकाठी सुद्धा गांधीजींशी मिळती जुळती आहे. ते महात्माजींप्रमाणेच निर्भय आहेत आणि प्रचंड आत्मक्लेश सहन करायला लागणारी आंतरिक शक्ती त्यांच्याकडे आहे. पण ह्याचबरोबर हेकेखोरपणा, आत्मप्रौढी आणि विशिष्ट व्यक्तींना झुकते माप देण्यासारखे महात्माजींचे काही ठळक दोषसुद्धा त्यांच्यात उतरले आहेत.
पण ह्या सगळ्या व्यक्तीपूजेच्या गदारोळात एक प्रश्न सगळ्यांनी नजरेआड केला तो म्हणजे लोकपाल सारखी नवी संस्था अथवा पद निर्माण करण्याची खरच गरज आहे का ? कुठलीही नविन व्यवस्था निर्माण करणे हे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेत सुधारणा करण्यापेक्षा नेहमीच जास्त वेळखाऊ आणि अवघड असते. त्यात सर्व राजकीय पक्षांचा ह्याबाबतीतला उत्साह बघता ह्या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे साक्षात ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही. एखादी व्यवस्था नीट चालत नाही म्हणजे ती व्यवस्थाच चुकीची आहे असे नाही. अशाप्रकारच्या सामाजीक व्यवस्था बहुतेक वेळा कारभार्यांमुळे फोल ठरतात. अण्णांच्या सर्व अटी मान्य करूनही जे नविन लोकपाल बनेल त्यामुळे साठ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असे खुद्द अण्णाच म्हणत आहेत. पण हाच परिणाम जर अस्तित्वात असलेल्या व्यवस्था आणि कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करून साध्य होणार असेल तर नविन व्यवस्थेचा खटाटोप कशासाठी ?
ही वेळ झालेल्या चुका सुधारण्याची आहे नविन चुका करण्याची नव्हे.

Saturday, August 6, 2011
ओरबाडलेली भक्ती
आजकाल पहाटे कुठल्याही रस्त्यावर फिरायला बाहेर पडलो की एक दॄष्य हमखास नजरेस पडते; दुसर्याच्या घराच्या अथवा इमारतीच्या कुंपणाबाहेर आलेली फुले ओरबाडणारी माणसे. मला असल्या माणसांची तुलना चोरांशीसुद्धा करावीशी वाटत नाही. चोराच्या मनात चोरी करताना नेहमीच आपण पाप करत असल्याची भावना असते पण ही माणसे जणू आपण एक महान पुण्यकर्म करत आहोत अशा भावनेने ही फुलांची ओरबाडणी करत असतात.
स्वतः फुलझाडे लावून, त्यांना वाढवून, त्यांचे संगोपन करण्याचे कष्ट ही माणसे घेत नाहीत तर दुसर्याने अत्यंत प्रेमाने वाढवलेल्या झाडांवर फुले येऊ लागली की जणूकाही ती आपल्याला ओरबाडण्यासाठीच उमलली आहेत असे समजून निष्ठूरपणे त्यावर हल्ला करतात. खेदाची बाब म्हणजे ह्या कुकर्मामध्ये तथाकथीत सुजाण ज्येष्ठ नागरीकच जास्त पुढे असलेले दिसतात.
कोणी त्यांना हटकल्यास “आम्ही काही आमच्यासाठी घेत नाही, देवालाच वाहणार आहोत. थोडे पुण्य तुमच्याही पदरी पडेलच की” असा युक्तीवाद केला जातो. मला सांगा कोणता देव अशा ओरबाडलेल्या भक्तीने प्रसन्न होत असेल ? खरंतर निसर्गाच्या इतक्या सुंदर कलाकृतीची नासधूस केल्याबद्दल त्याला रागच येत असेल. शायर शाहीद कबीर यांनी अतिशय समर्पक शब्दात सांगितलेले सत्य यांना कधी उमगणार ?
रंग आखोंके लिये बू है दमागोंके लिये
फूल को हाथ लगाने की जरूरत क्या है

Thursday, August 4, 2011
दारू
दारू म्हणजे दारू म्हणजे दारू असते
एक बेफाम अवखळ वारू असते
कधी लार्ज तर कधी स्मॉल असते
आधी राईज नंतर डाऊनफॉल असते
कधी खंबा तर कधी चपटी असते
झेपली नाही तर दणकून आपटी असते
कुणाची माधुरी तर कुणाची मधुबाला असते
कधी कोंदट बार तर कधी मधुशाला असते
विजयाचा जल्लोश कधी, कधी गम का साथी असते
भान सुटले तर मात्र संसाराची माती असते
एक बेफाम अवखळ वारू असते
कधी लार्ज तर कधी स्मॉल असते
आधी राईज नंतर डाऊनफॉल असते
कधी खंबा तर कधी चपटी असते
झेपली नाही तर दणकून आपटी असते
कुणाची माधुरी तर कुणाची मधुबाला असते
कधी कोंदट बार तर कधी मधुशाला असते
विजयाचा जल्लोश कधी, कधी गम का साथी असते
भान सुटले तर मात्र संसाराची माती असते
Friday, May 13, 2011
माझा पहिला 3D अनुभव
नुकताच ‘ रियो ’ नावाचा 3D ऍनिमेशनपट पाहिला. एक साधी सरळ गोष्ट मोजक्या व्यक्तीरेखांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे मांडली आहे. ऍनिमेशनपटाला आवश्यक असणार्या सर्व गोष्टी यात आहेत. वेगवान घटनाक्रम, प्रमुख पात्रांचा निरागसपणा आणि त्यांच्या मजेदार लकबी, कथेमधे मिसळून जाणारे संगीत आणि सुखद शेवट. पण ह्या सर्वांपेक्षा मनाला भुरळ घलतो तो 3D परिणाम.
कदाचित हा माझा पहिलाच 3D अनुभव असल्यामुळे असेल पण मी तर अक्षरश: मंत्रमुग्ध झालो होतो. ऍनिमेशनपट मुळातच रंगांची उधळण करणारे असतात त्यात हा तर ब्राझील मधल्या बहुरंगी पक्ष्यांच्या जीवनावर आधारलेला त्यामुळे डोळ्यांसमोर नुसती इंद्रधनुष्य फुलत होती. मी इतका सुंदर रंगाविष्कार ह्यापूर्वी कधीही पहिला नव्हता.
रियोने मला जणू चटकच लावली आहे. आता येणार्या सर्व 3D चित्रपटांची मी आतुरतेने वाट बघतो आहे.

Monday, May 2, 2011
क्रूरकर्मा संपला
कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन ठार मारला गेल्याचे वृत्त वाचून मिश्र भावना मनामधे उठल्या. एकीकडे माणुसकीला काळीमा फासणार्या नराधमाचा अंत झाला ह्याचा आनंद होत आहे तर दुसरीकडे ह्यामुळे पाकिस्तानला होणार्या प्रचंड फायद्याची चिंता लागून राहिली आहे.
ओसामा त्यांच्या भूमीवर मारला गेला याचे भांडवल पाकिस्तानचे सरकार नक्कीच करणार. त्यांची दहशतवादाविरुद्ध असलेली दुतोंडी भूमिका, तालिबानला असलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, आय एस आय चे दहशतवादी संघटनांबरोबर असलेले छुपे संबंध हे सर्व आता विसरले जाईल. अमेरिकन सरकार पुन्हा त्यांना सढळ हातने अर्थिक आणि सामरीक मदत करेल आणि ती मदत कोणाविरुद्ध वापरली जाईल हे आपल्याला सांगायची काही गरजच नाही.
त्यामुळे सध्या तरी मी जरा धास्तावलेलाच आहे.

Sunday, April 3, 2011
गुढीपाडवा
काल धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वविजयाची गुढी उभारली आणि अवघ्या भारतात एकच जल्लोष झाला. २८ वर्ष ज्या क्षणाची सर्वांनी आतुरतेनी वाट पाहिली तो सोन्याचा क्षण अनुभवण्याचे भाग्य काल १२० कोटी भारतीय जनतेला लाभले.
१९८७ नंतर प्रथमच एक अटीतटीचा अंतिम सामना विश्वचषक स्पर्धेमधे बघायला मिळाला. दोन्ही डावांमधे चढ उतार, हृदयाचे ठोके चुकवणारे क्षण, कधी पडझड तर कधी डावाची उभारणी असा क्रिकेटचा खरा आनंद देणारा खेळ बघून डोळ्याचे पारणे फिटले.
काल एका अद्भुत मंत्रानी भारावल्यासारखा आपला संघ खेळला आणि विजेतेपद जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या तोंडी तोच मंत्र होता "सचिनाय: नम:". संपूर्ण संघानी सचिनला दिलेले वचन पाळले आणि त्याला नववर्षाची नितांतसुंदर भेट दिली ह्याबद्दल सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. सचिनच्या दैदिप्यमान कारकीर्दीमधे कोणतीही उणीव राहू नये हेच लक्ष्य घेउन आपला संघ ही स्पर्धा खेळला.
सचिनचाही ह्या सगळ्या वाटचालीत सिंहाचा वाटा आहे. त्याने स्वत:च्या खेळींमधुन जणू इतरांसमोर एक आदर्शच उभा केला. काल सहकार्यांनी सचिनला खांद्यावरून मिरवले तेव्हा असंख्य क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. विराट कोहली अतिशय समर्पकपणे म्हणाला "ज्या महान खेळाडूने गेली २१ वर्ष तमाम भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे वाहिले त्याला खांद्यावर घेउन मिरवण्याचा दिवस आज आला आहे"
कोणीतरी गमतीमधे म्हणाला त्याप्रमाणे आता २०१२ मधे जगबुडी झाली तरी हरकत नाही. सचिनने विश्वकरंडक उंचावलेला बघितला आणि जीवन धन्य झाले.
गर्वाने फुगलेली छाती आणि पाणावलेल्या डोळ्यांसह , जय हिंद !!

Subscribe to:
Comments (Atom)