Saturday, August 6, 2011

ओरबाडलेली भक्ती

आजकाल पहाटे कुठल्याही रस्त्यावर फिरायला बाहेर पडलो की एक दॄष्य हमखास नजरेस पडते; दुसर्‍याच्या घराच्या अथवा इमारतीच्या कुंपणाबाहेर आलेली फुले ओरबाडणारी माणसे. मला असल्या माणसांची तुलना चोरांशीसुद्धा करावीशी वाटत नाही. चोराच्या मनात चोरी करताना नेहमीच आपण पाप करत असल्याची भावना असते पण ही माणसे जणू आपण एक महान पुण्यकर्म करत आहोत अशा भावनेने ही फुलांची ओरबाडणी करत असतात.

स्वतः फुलझाडे लावून, त्यांना वाढवून, त्यांचे संगोपन करण्याचे कष्ट ही माणसे घेत नाहीत तर दुसर्‍याने अत्यंत प्रेमाने वाढवलेल्या झाडांवर फुले येऊ लागली की जणूकाही ती आपल्याला ओरबाडण्यासाठीच उमलली आहेत असे समजून निष्ठूरपणे त्यावर हल्ला करतात. खेदाची बाब म्हणजे ह्या कुकर्मामध्ये तथाकथीत सुजाण ज्येष्ठ नागरीकच जास्त पुढे असलेले दिसतात.

कोणी त्यांना हटकल्यास “आम्ही काही आमच्यासाठी घेत नाही, देवालाच वाहणार आहोत. थोडे पुण्य तुमच्याही पदरी पडेलच की” असा युक्तीवाद केला जातो. मला सांगा कोणता देव अशा ओरबाडलेल्या भक्तीने प्रसन्न होत असेल ? खरंतर निसर्गाच्या इतक्या सुंदर कलाकृतीची नासधूस केल्याबद्दल त्याला रागच येत असेल. शायर शाहीद कबीर यांनी अतिशय समर्पक शब्दात सांगितलेले सत्य यांना कधी उमगणार ?

रंग आखोंके लिये बू है दमागोंके लिये
फूल को हाथ लगाने की जरूरत क्या है

No comments:

Post a Comment