Monday, October 10, 2011

झुकी झुकी सी नजर

गेले दहा बारा दिवस जी बातमी कानावर कधीच पडू नये अशी प्रार्थना असंख्य गझलप्रेमी करत होते ती शेवटी आज आलीच. एक अद्भुत आवाज कायमचा हरपला. भारतामधील कुठल्याही गझलप्रेमी माणसाला त्याच्या आवडत्या गझल गायकांची यादी करायला सांगितली तर जगजित सिंग यांचे नाव नक्कीच पहिल्या तीनात सापडेल.

माझी गझलशी ओळख जरी गुलाम अलींच्या आवाजानी झाली असली तरी गझलचे वेड लावण्यात मोठा वाटा जगजितजींचा पण होता. कॉलेज मधे असताना किती रात्री त्यांच्या गझला ऐकत सरल्या त्याची मोजदाद करणे कठिण आहे. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर त्यांचा आवाज मनावर हळूवार फुंकर घालायचा.

आमच्या तारुण्याच्या उन्मादाची जेव्हा पालकांना धास्ती वाटायची तेव्हा आठवायचे “लोग हर मोड पे रुक रुक के संभलते क्यूँ है, इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यूँ है”, पहिल्या चुंबनाची आठवण करुन द्यायचे “लबोंसे लब जो मिल गए लबोंसे लब ही सिल गए, सवाल गुम जवाब गुम बडी हसीन रात थी” संसाराच्या रगाड्यात कुठेतरी अचानक “कागज की कश्ती” कानावर पडायचे आणि पुन्हा चिंब पावसात भिजून पाण्यात होड्या सोडाव्याशा वाटायच्या. “चंद मासूमसे पत्तोंका लहू है ‘फ़ाकिर’” ऐकल्यानंतरची घुसमट कोणाला कशी कळणार ? “अब मै राशन की कतारोंमे नजर आता हूँ” हे वास्तव “सच्ची बात कही थी मैंने” म्हणत म्हणत हाच अवलिया गालिबच्या अजब दुनियेची सैर सुद्धा करवून आणायचा.

गझलेला उच्चभ्रू दिवाणखान्यातून बाहेर काढून जनमानसात रुजवण्याचे महान काम जगजितजींनी केले. स्वतःचे वैयक्तिक दुःख विसरून दुसर्‍याला जगण्याची उमेद देणे हे काम फक्त देवदूतच करू शकतात. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा सुरेल आत्म्याचा संग लाभला. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही.

किती आठवणी आणि किती हळवे कोपरे आज पोरके झाले !!

No comments:

Post a Comment