Sunday, July 30, 2017

अयान... कोण ?

नुकतीच एका मित्राने राधा आणि कृष्णाचे नाते विशद करणारी एक काव्यरचना पाठवली

बिंब होते राधेचे
प्रतिबिंब ते कृष्णाचे |
मनी बिंबले दोहोंचे
तनापारचे नाते ||

अद्वैताची साक्ष याहूनी
असेल कुठली सांगा |
काठावरती दिसेल राधा
पाण्यातील श्रीरंगा ||

सोबत एक छान चित्र होते ज्यात नदीच्या काठावर राधा बसली आहे पण पाण्यातले प्रतीबिंब मात्र कृष्णाचे आहे

तुमच्या आमच्या नजरेतून पाहीले तर हे काव्य आणि चित्र प्रेमाचा अतिशय उदात्त, उत्कट अविष्कार म्हणून बघितले जाईल. निर्हेतूक निरपेक्ष नात्याचे एक उदाहरण वगैरे ...

पण खोलात जाऊन बघताना हा विचार मनात आला की 'अयान'चा; राधेच्या पतीचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा द्रृष्टीकोन कसा असेल ?

अद्वैत प्रेमाची साक्ष जगाला पटवून देण्यासाठी सर्वात मोठी किंमत तर त्यानेच मोजली आहे. त्याचे राधेवरील प्रेम तितकेच उदात्त, उत्कट आहे. फरक फक्त इतकाच की ते द्वैत, सहेतूक आहे. पण त्याच्या नशीबी कायम उपेक्षा आणि असफलताच ! साक्षात श्रीकृष्णच प्रतिस्पर्धक असल्यावर दुसरे काय होणार ? पण तरी त्याने कधी राधेचे वाईट चिंतले नाही, तिला विषाचा प्याला दिला नाही. शेवटपर्यंत तो तिच्यावर प्रेमच करत राहीला.

त्याच्या घुसमटीला, अवहेलनेला कोणी कधी शब्दबद्ध केले नाही. त्याच्या असहायतेने कोणाचे डोळे पाणावले नाहीत. तो कायमच पडद्यामागून राधेला मिळणारे देवत्व पाहात राहिला. राधा कृष्णाच्या लीलांचे ग्रंथ बनत असताना 'अयान' मात्र इतिहासातून पुसला गेला.

Thursday, July 6, 2017

रूप तुझे निर्मळ

चिंतोनी मनोभावे, रूप तुझे निर्मळ ।
दरवळे परिमळ, जीवनी माझ्या ।।

फिटली दु:खे, आणिक चिंता सकळ ।
उरला निखळ, आनंद आता ।।

चरणी तुझ्या लागता, मिटली तळमळ ।
उमलले कमळ, हृदयी माझ्या ।।

मुक्त करा जीव, घेवोनी जवळ ।
आयुष्य सफळ, फड्या म्हणे ।।

Friday, February 10, 2017

जरी

रोज नव्याने तुला पाहतो मी
रोज नवी असलीस ना जरी

स्वप्ने तुझीच डोळ्यात असती
डोळ्यासमोर असलीस ना जरी

तुझ्या स्मृतीचा गंध येई पहाटे
कुशीत तू असलीस ना जरी

उठती अजूनही रोमांच अंगांगी
स्पर्शण्या मला असलीस ना जरी

आतूर डोळे वाट तुझीच बघती
परतुनी येणार असलीस ना जरी

Thursday, August 21, 2014

थोडीशी घेऊ दे

मला माझीच भेट घेऊ दे
आज जरा थोडीशी घेऊ दे

चेहर्‍यांच्या गर्दीत घुसमटलो आहे
एकटक क्षितिजापार पाहू दे

गोंगाट कोलाहलापासून दूर
मनातच एक छानसे गाणे गाऊ दे

भडक रंगांना खोल खोल बुडवून
स्तब्ध अंधाराचा थांग लावू दे

मग येईनच मी पुन्हा माणसात
आज जरा थोडीशी घेऊ दे

Thursday, July 31, 2014

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा मन पाखरू झाले
हूरहूर काहूर मन बावरू झाले

पुन्हा एकदा आले आभाळ दाटून
थेंब भुई थुईथुई मन नाचरू झाले

पुन्हा एकदा येई झुळुक हवीशी
अल्लड हुल्लड मन वासरू झाले

पुन्हा एकदा कोणी भेटे अचानक
धुंद बेधुंद मन अनावरू झाले

Wednesday, January 29, 2014

आताशा कळेना

आताशा कळेना हे का असे व्हावे
ऊठसूट मन आठवणींमागे धावे

निमित्त व्हावे मग ’दुनियादारी’चे
अन् खोल आतून कोणी हुंकारत जावे

फोटोमधे जरी दिसती सारे तेच चेहरे
गेले कुठे ते हेच कोणा ना कळावे

जीवलग मैत्रीचे घट्ट बहुपेडी धागे
संवादाविना का असे उसवत जावे

गोळा करू जाता जशी निसटते वाळू
हात ’आमोद’चे रिते रितेच उरावे

Wednesday, November 13, 2013

एव्हरेस्ट रिटायर होतोय !

चंद्रावर पाऊल ठेवणारा पाचवा माणूस कोण?
एव्हरेस्ट सर करणार सदतीसावा गिर्यारोहक कोण?
भारताचे आठवे राष्ट्रपती कोण?
टेस्ट क्रिकेटमधे १०००० धावांचा टप्पा पार करणारा अकरावा फलंदाज कोण?

डोकं खाजवाव लागतय ना? ह्या प्रश्नांच्या उत्तरांमधे सचिनचे मोठेपण दडलेले आहे. सचिनचे बहुतेक विक्रम हे ’पहिला’ किंवा ’सर्वात जास्त’ या प्रकारामधे मोडतात. त्याचे सगळेच्या सगळे विक्रम कदाचित मोडले जातील पण जसे एव्हरेस्ट म्हटले की एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग आठवतात तसेच क्रिकेट म्हटले की डॉन ब्रडमन आणि सचिनच आठवतील.

अनेकांची त्याच्या कारकीर्दीच्या शेवटाबद्दल तक्रार आहे पण ह्या काहीश्या लांबलेल्या कारकीर्दीमधे त्याने जे काही करून दाखवले आहे त्याची तुलना करणे अशक्यच आहे. अनेक उपटसुंभांनी त्याच्या निवृत्तीबद्दल केलेल्या ’विशेष टिप्पण्या’ ऐकल्या की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. माझ्यालेखी सचिन नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेत आला आहे. ज्यावेळी त्याला हे जाणवले की २०-२० साठी सळसळत्या तरूण रक्ताची गरज आहे त्यावेळी तो आपण होऊन त्या क्रीडाप्रकारमधून बाजूला झाला. वन-डेमधेही ज्यावेळी त्याची चपळता कमी झाल्याचे जाणवले त्याक्षणी तो अध्याय त्याने संपवला. टेस्टमधे अजूनही काही योगदान देणे बाकी आहे असे त्याला वाटले असेल म्हणून कदाचित तो आत्तापर्यंत थांबला असेल. कदाचित त्याला खात्री पटली असेल की भारतीय संघाची धुरा सांभाळायला आता नविन खंबीर खांदे तयार झाले आहेत.

अजून एक तक्रार सचिनबद्दल नेहमी ऐकू येते ती म्हणजे तो नेहमी विक्रमांसाठी खेळला देशासठी नाही. पण जर आपण निव्वळ आकडेवारीवर नजर टाकली तरी हे स्पष्ट होईल की भारताच्या असंख्य विजयांमधे त्याचा मोलाचा वाटा आहे. वन-डे मधले त्याचे योगदान तर त्याचा कट्टर शत्रूसुद्धा नाकारू शकणार नाही.


’जन पळभर म्हणतील हाय हाय’ या अटळ सत्यानुसार क्रिकेट, विक्रम सगळेच नेहमीप्रमाणे चालू राहील. स्टेडियम अशीच तुडुंब भरून वाहात असतील पण क्रिकेटरसिकाच्या हृदयात एक जागा कायमच रिकामी राहील.