Thursday, October 4, 2012

उलुशी ओंजळ

उलुश्या जनतेचा
उलुसा पक्ष
नेत्यांसाठी सातमजली
वातानुकूलित कक्ष

उलुश्या देवाला
उलुसा नेवेद्य
भक्तगण लाटती
उरलेले खाद्य

उलुसे स्वप्न
उलुश्या आशा
चोहीकडे मात्र
अंधारलेल्या दिशा

उलुश्या लोकांच्या
उलुश्या गरजा
तरी कशा चुकती
जमा खर्चाच्या बेरजा ?

उलुशी ओंजळ
उलुसा पसा
समृद्धीचा ओघ
त्यात मावणार कसा ?

Saturday, August 4, 2012

जनलोकपाल पार्टी

अपेक्षेनुसार ह्या वेळेचे अण्णांचे उपोषण बारगळलेच. गेल्या वर्षी अण्णांना मिळालेला जनाधार ह्या वर्षी अजिबात दिसून आला नाही. ह्या ओसरत्या लोकप्रियतेला सर्वस्वी टीम अण्णाच जबाबदार आहे.

आपल्या मनमानी कारभारामुळे आणि धरसोड वृत्तीमुळे सामान्य जनतेचा आशेचा एकमेव किरणही लोप होत चालला आहे. एक म्हणजे टीम अण्णा ही एक टीम म्हणवून घ्यायच्या लायकीचीच नाही. टीम किंवा संघ हे नेहमीच एक सामुदायिक प्रतिनिधीत्व असते. नेमकी हीच गोष्ट टीम अण्णाला जमली नाही. गेल्या वर्षात जनतेनी ह्या टीममधला विसंवाद वेळोवेळी अनुभवला आहे. जो तो स्व:तचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाची साथ घ्यायची आणि कोणाला दूर ठेवायचे ह्याबाबतही एकमत होताना दिसत नाही.

टीम अण्णाचा दुसरा मोठा दुर्गुण म्हणजे स्वमग्नता. मी ठरवीन तो चोर आणि मी म्हणेन ती शिक्षा हे फक्त हुकूमशाही किंवा एकाधिकारशाहीतच चालू शकते. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगल्भ लोकशाही राष्ट्रात ही विचारधारा रुजणे कधीही शक्य नाही. कुठलेही पुरावे न देता दुसर्‍यावर सनसनाटी आरोप करणे आणि स्व:तवर पुरव्यानिशी आरोप झाल्यावरही ते नाकारणे हा शुद्ध दांभिकपणा आहे.

जोवर जनाधाराचा वारा वहात होता तोवर ते तारू तरले आणि नंतर शीड तुटलेल्या जहजासारखे भरकटले. छुप्या मर्गानी जी सत्ता मिळवता आली नाही ती आता रीतसर निवडणुकांच्या मार्गानी मिळवण्याचे टीमने ठरवले आहे. लोकनेतृत्वाच्या माळेचे ओझे सहन करू शकणारे कणखर आणि खंबीर खांदे खरच टीम अण्णाकडे आहेत का हे आत लवकरच दिसून येईल. आपल्यातल्या मूलभूत उणिवा दूर करून जनतेपुढे एक सक्षम पर्याय उभा करण्याची सुबुद्धी आणि शक्ती टीम अण्णाला लाभो हीच सदिच्छा.

Wednesday, June 13, 2012

अब के हम बिछडे

गझलप्रेमींना एकामागून एक धक्के द्यायचेच नियतीने ठरवले आहे असे वाटते. जगजितजींच्या दुखातून अजून आम्ही पूर्णपणे बाहेर पडतो आहोत तोच एक अजून जबरदस्त वार कलेज्यावर झाला आहे. गझलसम्राट ह्या पदवीला ज्यानी खरी शोभा बहाल केली तो अत्यंत तरल आवाज आम्हाला आज सोडून गेला आहे.

गझलसम्राट मेहदी हसन साहेब म्हणजे गझल गायकीचे मूर्तीमंत उदाहरण. गझलेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागचा भाव जसाच्या तसा रसिकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी इतर कुणाला जमलीच नाही. गझलेच्या दरबारातली एकहून एक सरस रत्ने अशी गळून जात आहेत.

महफिलें अब सूनी हो गयी हैं

आणि आमचे दुर्भाग्य हे की आशेचा एकही किरण नजरेस पडत नाही. नविन गायक गझल हा प्रकार जणू विसरूनच गेले आहेत. बरोबर आहे म्हणा शब्द, अर्थ, भाव असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? संगीताच्या गदारोळापेक्षा ऊंच आवाज चढवता आला म्हणजे झाले.

मेहदी साहेबांच्याच शब्दात सांगायचे तर...

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमे मिले

Friday, April 27, 2012

प्रवास

तिच्या आठवणी माझ्यासवे घेऊन चाललो
विझलेल्या डोळ्यात दोन आसवे घेऊन चाललो

ओसाड वाळवंट पुढे पसरले
माथ्यावर तिची सावली घेऊन चाललो

आडवा आला वाटेवरी जेव्हा एकांत हा
बनवून दोस्त त्याला घेऊन चाललो

आता खरा प्रवास सुरु झाला 'आमोद'
ऊब चितेची साथीला घेऊन चाललो

Wednesday, April 4, 2012

आय पी एल

आज आयपीएल नावाची सर्कस सुरू होतेय. मी स्पर्धा म्हणून आयपीएल कडे कधी बघितलेच नाही. पण मला ह्या सर्कशीतले सगळे खेळ बघायला आवडतात. आयपीएल मधे काय नाही? तिथे ग्लॅमर आहे, नाच आहे, दणकेबाज संगीत आहे, चौकार षटकारांची आतिषबाजी आहे आणि स्थानिक अस्मिता सुद्धा आहे. पुणे वॉरीयर्स दाखल झाल्या पासून मी इतर कुठल्याही टीमला चीअर केले नाही.

आयपीएल हे सध्या टी व्ही वर दाखवल्या जाणार्‍या आयपीएल च्याच जाहिरातीप्रमाणे आहे. दोन घडी झकास करमणूक करणारी एक झगमगती जत्रा. बंगलोरच्या टीममधे कोण खेळणार यापेक्षा सिधार्थ मल्ल्याबरोबर कटरीना असणार का दीपीका याचीच चर्चा जास्त होते. पंजाब जिंकल्या नंतर प्रीती कोणाला मिठी मारणार यावरही पैजा लागतात.

पण मग यात क्रिकेट कुठे आहे ? ते आहेच की ? २४० चेंडू टाकले जातात, फलंदाज फटके मारतात, गोलंदाज दांड्या उडवतात, झेल पकडले आणि सोडले जातात, प्रतिस्पर्ध्यांची नजरानजर होते, क्वचित शिव्याही घातल्या जातत.

सच्चे क्रिकेटप्रेमी ह्या गदारोळात तांत्रिक शुद्धता शोधतात आणि निराश होतात. पण माझ्यामते कसोटी क्रिकेट आयपीएल च्या शापानी मरेल इतकी मरतुकडी गाय नक्कीच नाही. आयपीएल जाता येता तोंडात टाकायचे चणे फुटाणे आहेत तर कसोटी क्रिकेट पंचपक्वानांनी भरलेले ताट. तेव्हा काही काळ ह्या चटपटीत चणे फुटाण्यांचा आस्वाद घ्या. भरलेले ताट आहेच नंतर ताव मारायला. काय ?

Friday, January 13, 2012

चोळणं म्हणजे काय रे भाऊ ?

आज पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियानी भारतीय क्रिकेट संघाची जी काही वाट लावली त्याला शुद्ध मराठीमधे ‘चोळणे’ असे म्हणतात. अरे काय चाललय काय ? आपले दहा फलंदाज मरतमरत १६१ धावा करतात आणि त्यांचा एकटा वॉर्नरच १०४ धावा कुटतो तेही एकाच खेळपट्टीवर आणि एकाच दिवशी ? म्हणजे खेळपट्टीचे स्वरूप बदलले वगैरे म्हणण्याची पण सोय नाही.

लोकं येतात काय चार चेंडूंना हातातली फळी लावायचा प्रयत्न करतात काय आणि एकदाची फळी चेंडूला लागली की लगेच परत तंबूत जातात काय काहीच डोक्यात शिरत नव्हतं. बरं फलंदाज चुकले आता गोलंदाजांकडून काही अपेक्षा ठेवाव्यात तर त्यांची तर ‘न भूतो न भविष्यति’ अशी धुलाई केली वॉर्नर आणि कोवाननी.

ह्यापुढे भारतीय संघ परदेशी गेला की त्यांना प्रत्येक डावात दोनदा फलंदाजी दिली जाईल असा नियम आयसीसीने करून टाकायला हवा. नाहीतर ह्यापुढील सर्व कसोटी सामने फक्त भारतात होतील असे तरी जाहीर करावे. असे क्रांतीकारी निर्णय घेतल्याशिवाय भारतीय संघाला कसोटी जिंकणे शक्य होईल असे वाटत नाही. पवार साहेब आता जरा तुम्हीच यात जातीने लक्ष घाला.