अपेक्षेनुसार ह्या वेळेचे अण्णांचे उपोषण बारगळलेच. गेल्या वर्षी अण्णांना मिळालेला जनाधार ह्या वर्षी अजिबात दिसून आला नाही. ह्या ओसरत्या लोकप्रियतेला सर्वस्वी टीम अण्णाच जबाबदार आहे.
आपल्या मनमानी कारभारामुळे आणि धरसोड वृत्तीमुळे सामान्य जनतेचा आशेचा एकमेव किरणही लोप होत चालला आहे. एक म्हणजे टीम अण्णा ही एक टीम म्हणवून घ्यायच्या लायकीचीच नाही. टीम किंवा संघ हे नेहमीच एक सामुदायिक प्रतिनिधीत्व असते. नेमकी हीच गोष्ट टीम अण्णाला जमली नाही. गेल्या वर्षात जनतेनी ह्या टीममधला विसंवाद वेळोवेळी अनुभवला आहे. जो तो स्व:तचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाची साथ घ्यायची आणि कोणाला दूर ठेवायचे ह्याबाबतही एकमत होताना दिसत नाही.
टीम अण्णाचा दुसरा मोठा दुर्गुण म्हणजे स्वमग्नता. मी ठरवीन तो चोर आणि मी म्हणेन ती शिक्षा हे फक्त हुकूमशाही किंवा एकाधिकारशाहीतच चालू शकते. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगल्भ लोकशाही राष्ट्रात ही विचारधारा रुजणे कधीही शक्य नाही. कुठलेही पुरावे न देता दुसर्यावर सनसनाटी आरोप करणे आणि स्व:तवर पुरव्यानिशी आरोप झाल्यावरही ते नाकारणे हा शुद्ध दांभिकपणा आहे.
जोवर जनाधाराचा वारा वहात होता तोवर ते तारू तरले आणि नंतर शीड तुटलेल्या जहजासारखे भरकटले. छुप्या मर्गानी जी सत्ता मिळवता आली नाही ती आता रीतसर निवडणुकांच्या मार्गानी मिळवण्याचे टीमने ठरवले आहे. लोकनेतृत्वाच्या माळेचे ओझे सहन करू शकणारे कणखर आणि खंबीर खांदे खरच टीम अण्णाकडे आहेत का हे आत लवकरच दिसून येईल. आपल्यातल्या मूलभूत उणिवा दूर करून जनतेपुढे एक सक्षम पर्याय उभा करण्याची सुबुद्धी आणि शक्ती टीम अण्णाला लाभो हीच सदिच्छा.
No comments:
Post a Comment