Sunday, June 17, 2018

कॉंग्रेस - एक विश्लेषण

कॉंग्रेसच्या प्रवासाचे तीन प्रमुख टप्पे मला जाणवतात. या तीन टप्प्यांमधील त्यांचे योगदान व चुका ह्या त्यांच्या सध्याच्या परीस्थितीला जबाबदार आहेत.

पहिला टप्पा होता 1947 - 1970. स्वातंत्र्यानंतरचा हा कालखंड माझ्यामते कॉंग्रेसचा सुवर्णकाळ होता. ह्या टप्प्यात कॉंग्रेसला प्रचंड जनाधार लाभला. दुसर्या कुठल्याच राजकीय पक्षाकडे त्यावेळी कॉंग्रेसला पर्याय होऊ शकेल इतकी ताकद नव्हती. अती उजवे आणि अती डावे यांच्यापेक्षा मवाळ मध्यममार्गी कॉंग्रेस जनतेला अधिक भावली. कॉंग्रेसचे तात्कालीन नेतेसुद्धा तत्ववादी आणि स्वच्छ चारित्र्याचे होते. राष्ट्रसेवा, राष्ट्रउभारणी हे प्राधान्यक्रम होते. फाळणीची चूक सरदार पटेलांनी संस्थाने संघराज्यात जोडून बरीचशी पुसून काढली होती. पण कॉंग्रेसने मात्र पटेलांची कदर केली नाही. ज्या प्रमाणात नेहरू घराण्यातली पुढची पिढी 'प्रमोट' केली गेली त्या प्रमाणात पटेलच काय पण खुद्द महात्माजींचे वंशजसुद्धा पुढे येऊ शकले नाहीत. उलट गांधी या नावाच्या प्रभावाचा इतर कोणी उपयोग करू नये म्हणून इंदिराजींनाच 'गांधी' बनवण्यात आले. तरीही स्वातंत्र्याच्या मागेपुढे जन्मलेली पिढी कायम कॉंग्रेस बरोबरच राहिली.

1970 - 1990 ह्या टप्प्यात कॉंग्रेसनी तत्व, चारित्र्य, राष्ट्रसेवा ह्या सगळ्याला तिलांजली दिली. स्वातंत्र्यलढ्यातली पिढी आता पडद्याआड गेली होती आणि पहिल्या टप्प्यात चातुर्यानी पेरलेल्या 'गांधी' आता चांगल्याच डवरून आल्या होत्या. केवळ स्वसंवृद्धी आणि पक्षसंवृद्धी हाच कार्यक्रम राबवला गेला. तत्वहीन, भ्रष्टाचारी वृत्तींचा शिरकाव झाला आणि यातूनच आणिबाणीसारखी घोडचूक घडली. माझ्यामते कॉंग्रेसच्या जनाधाराला गळती लागण्याचे एक प्रमुख कारण आणिबाणी होते. याच काळात सामाजिक पटलावर धुमसणार्या विरोधाला व्यासपीठ उत्पन्न झाले. कॉंग्रेसला प्रथमच पराभव चाखावा लागला आणि कॉंग्रेसला खर्याअर्थी पर्याय देऊ शकेल अशी राजकीय व्यवस्था जन्माला आली.

1990 पासून पुढे. या टप्प्यामधे प्रादेशिक पक्षांनी भलताच जोर धरला होता. आपापल्या राज्यात यांना प्रचंड जनाधार आहे आणि राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावण्याचे स्वप्न असले तरी सध्यापुरते ते आपापल्या राज्यात समाधानी आहेत. पण या प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेस, भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांची चांगलीच कोंडी केली. आघाडी सरकारांचा हा काळ. कॉंग्रेस समविचारी पक्षांना बरोबर घेऊन वाटचाल करत होती पण तरीही स्वःतचा मोठेपणा सतत इतरांवर बिंबवण्याचा मोह काही सुटत नव्हता. आघाडी सरकारची अपरिहार्यता आणि भ्रष्टाचाराकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे कॉंग्रेसचा जनाधार झपाट्याने घटत होता. स्वतंत्र भारतात जन्माला आलेली आजची पिढी कॉंग्रेसबरोबर 'रिलेट'च करू शकली नाही. देशासाठी त्याग केलेली कॉंग्रेस ही नव्हे हे ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. इंटरनेट आणि इतर सोशल मिडीयाच्या माध्यमांमधून दुसर्या देशातील स्वच्छ सरकारे त्यांना स्पष्ट दिसत होती. अशातच एकामागून एक भ्रष्टाचाराचे घोटाळे उघड होऊ लागले आणि जनतेच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला.

भाजपच्या झंझावातापुढे जवळजवळ तीन वर्ष भंजाळल्यासारखी दिसणारी कॉंग्रेस आता जरा पाय रोवून उभी राहताना दिसते आहे. पण जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा कमावणे हे अतिशय अवघड काम आहे. कॉंग्रेसचे आजचे नेतृत्व बघता तर हे काम अशक्यच वाटते. कर्तुत्वहीन घराणेशाहीला आजची पिढी कधीच स्विकारणार नाही हे मान्य करूनच कॉंग्रेसला पुढची वाटचाल करावी लागेल.

No comments:

Post a Comment