Monday, October 30, 2017

जीवनवर्तुळ

"वपु" समजण्यासाठी, आवडण्यासाठी, भिडण्यासाठी वयाची तशी फारशी अट नाही. पण एका विशिष्ट मनस्थीतीमधे त्यांचं लिखाण पटकन मनात घर करून जातं. स्पष्ट सांगायचं तर प्रेमात पडलेला किंवा प्रेमभंग झालेला वपुंच्या नादी लवकर लागतो. अस्मादिक सुद्धा या प्रसंगातून गेलेले असल्यामुळे अशी वपुंच्या नादी लागलेली माणसं पटकन ओळखता येतात.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे त्यावेळी माझी आणि माझ्यासारख्या इतरांची यथेच्च हेटाई करणारा एक मित्र आता तीच सगळी लक्षणं दाखवतो आहे. आजकाल WhatsApp आणि इतर सोशल मिडीयावर एखाद्यानी टाकलेल्या कमेंटस् आणि स्टेटस वरून त्याची मनस्थीती झटकन समजते. काल जो वपु वरून आमची टेष्टा करायचा आज चक्क त्याच्या DP ला वपु ?

एखाद्यावर उद्भवलेल्या परिस्थितीची जेव्हा आपण चेष्टा करतो तेव्हा ती परिस्थिती आपल्यावर येणारच नाही ही जी खात्री आपल्याला असते त्यातला फोलपणा अधोरेखीत झाला.

असो .. आमच्या मित्राच्या आयुष्यातील एक जीवनवर्तुळ पूर्ण झाले.

Thursday, August 17, 2017

मैत्री

स्वतःच्या आधी मित्राचा विचार करते
ती मैत्री

मला काय मिळाले पेक्षा मी काय दिले हे मानते
ती मैत्री

प्रसंगी स्वतःचे मन मारून मित्राचे मन जपते
ती मैत्री

जगाने साथ सोडली तरी मित्राचा हात घट्ट धरते
ती मैत्री

न बोलता न सांगता मित्राला समजून घेते
ती मैत्री


आभासी नात्यांच्या जगात शेवटपर्यंत टिकून राहते
ती मैत्री

Sunday, July 30, 2017

अयान... कोण ?

नुकतीच एका मित्राने राधा आणि कृष्णाचे नाते विशद करणारी एक काव्यरचना पाठवली

बिंब होते राधेचे
प्रतिबिंब ते कृष्णाचे |
मनी बिंबले दोहोंचे
तनापारचे नाते ||

अद्वैताची साक्ष याहूनी
असेल कुठली सांगा |
काठावरती दिसेल राधा
पाण्यातील श्रीरंगा ||

सोबत एक छान चित्र होते ज्यात नदीच्या काठावर राधा बसली आहे पण पाण्यातले प्रतीबिंब मात्र कृष्णाचे आहे

तुमच्या आमच्या नजरेतून पाहीले तर हे काव्य आणि चित्र प्रेमाचा अतिशय उदात्त, उत्कट अविष्कार म्हणून बघितले जाईल. निर्हेतूक निरपेक्ष नात्याचे एक उदाहरण वगैरे ...

पण खोलात जाऊन बघताना हा विचार मनात आला की 'अयान'चा; राधेच्या पतीचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा द्रृष्टीकोन कसा असेल ?

अद्वैत प्रेमाची साक्ष जगाला पटवून देण्यासाठी सर्वात मोठी किंमत तर त्यानेच मोजली आहे. त्याचे राधेवरील प्रेम तितकेच उदात्त, उत्कट आहे. फरक फक्त इतकाच की ते द्वैत, सहेतूक आहे. पण त्याच्या नशीबी कायम उपेक्षा आणि असफलताच ! साक्षात श्रीकृष्णच प्रतिस्पर्धक असल्यावर दुसरे काय होणार ? पण तरी त्याने कधी राधेचे वाईट चिंतले नाही, तिला विषाचा प्याला दिला नाही. शेवटपर्यंत तो तिच्यावर प्रेमच करत राहीला.

त्याच्या घुसमटीला, अवहेलनेला कोणी कधी शब्दबद्ध केले नाही. त्याच्या असहायतेने कोणाचे डोळे पाणावले नाहीत. तो कायमच पडद्यामागून राधेला मिळणारे देवत्व पाहात राहिला. राधा कृष्णाच्या लीलांचे ग्रंथ बनत असताना 'अयान' मात्र इतिहासातून पुसला गेला.

Thursday, July 6, 2017

रूप तुझे निर्मळ

चिंतोनी मनोभावे, रूप तुझे निर्मळ ।
दरवळे परिमळ, जीवनी माझ्या ।।

फिटली दु:खे, आणिक चिंता सकळ ।
उरला निखळ, आनंद आता ।।

चरणी तुझ्या लागता, मिटली तळमळ ।
उमलले कमळ, हृदयी माझ्या ।।

मुक्त करा जीव, घेवोनी जवळ ।
आयुष्य सफळ, फड्या म्हणे ।।

Friday, February 10, 2017

जरी

रोज नव्याने तुला पाहतो मी
रोज नवी असलीस ना जरी

स्वप्ने तुझीच डोळ्यात असती
डोळ्यासमोर असलीस ना जरी

तुझ्या स्मृतीचा गंध येई पहाटे
कुशीत तू असलीस ना जरी

उठती अजूनही रोमांच अंगांगी
स्पर्शण्या मला असलीस ना जरी

आतूर डोळे वाट तुझीच बघती
परतुनी येणार असलीस ना जरी