Thursday, August 21, 2014

थोडीशी घेऊ दे

मला माझीच भेट घेऊ दे
आज जरा थोडीशी घेऊ दे

चेहर्‍यांच्या गर्दीत घुसमटलो आहे
एकटक क्षितिजापार पाहू दे

गोंगाट कोलाहलापासून दूर
मनातच एक छानसे गाणे गाऊ दे

भडक रंगांना खोल खोल बुडवून
स्तब्ध अंधाराचा थांग लावू दे

मग येईनच मी पुन्हा माणसात
आज जरा थोडीशी घेऊ दे

Thursday, July 31, 2014

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा मन पाखरू झाले
हूरहूर काहूर मन बावरू झाले

पुन्हा एकदा आले आभाळ दाटून
थेंब भुई थुईथुई मन नाचरू झाले

पुन्हा एकदा येई झुळुक हवीशी
अल्लड हुल्लड मन वासरू झाले

पुन्हा एकदा कोणी भेटे अचानक
धुंद बेधुंद मन अनावरू झाले

Wednesday, January 29, 2014

आताशा कळेना

आताशा कळेना हे का असे व्हावे
ऊठसूट मन आठवणींमागे धावे

निमित्त व्हावे मग दुनियादारीचे
अन् खोल आतून कोणी हुंकारत जावे

फोटोमधे जरी दिसती सारे तेच चेहरे
गेले कुठे ते हेच कोणा ना कळावे

जीवलग मैत्रीचे घट्ट बहुपेडी धागे
संवादाविना का असे उसवत जावे

गोळा करू जाता जशी निसटते वाळू
हात आमोदचे रिते रितेच उरावे