Monday, October 10, 2011

झुकी झुकी सी नजर

गेले दहा बारा दिवस जी बातमी कानावर कधीच पडू नये अशी प्रार्थना असंख्य गझलप्रेमी करत होते ती शेवटी आज आलीच. एक अद्भुत आवाज कायमचा हरपला. भारतामधील कुठल्याही गझलप्रेमी माणसाला त्याच्या आवडत्या गझल गायकांची यादी करायला सांगितली तर जगजित सिंग यांचे नाव नक्कीच पहिल्या तीनात सापडेल.

माझी गझलशी ओळख जरी गुलाम अलींच्या आवाजानी झाली असली तरी गझलचे वेड लावण्यात मोठा वाटा जगजितजींचा पण होता. कॉलेज मधे असताना किती रात्री त्यांच्या गझला ऐकत सरल्या त्याची मोजदाद करणे कठिण आहे. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर त्यांचा आवाज मनावर हळूवार फुंकर घालायचा.

आमच्या तारुण्याच्या उन्मादाची जेव्हा पालकांना धास्ती वाटायची तेव्हा आठवायचे “लोग हर मोड पे रुक रुक के संभलते क्यूँ है, इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यूँ है”, पहिल्या चुंबनाची आठवण करुन द्यायचे “लबोंसे लब जो मिल गए लबोंसे लब ही सिल गए, सवाल गुम जवाब गुम बडी हसीन रात थी” संसाराच्या रगाड्यात कुठेतरी अचानक “कागज की कश्ती” कानावर पडायचे आणि पुन्हा चिंब पावसात भिजून पाण्यात होड्या सोडाव्याशा वाटायच्या. “चंद मासूमसे पत्तोंका लहू है ‘फ़ाकिर’” ऐकल्यानंतरची घुसमट कोणाला कशी कळणार ? “अब मै राशन की कतारोंमे नजर आता हूँ” हे वास्तव “सच्ची बात कही थी मैंने” म्हणत म्हणत हाच अवलिया गालिबच्या अजब दुनियेची सैर सुद्धा करवून आणायचा.

गझलेला उच्चभ्रू दिवाणखान्यातून बाहेर काढून जनमानसात रुजवण्याचे महान काम जगजितजींनी केले. स्वतःचे वैयक्तिक दुःख विसरून दुसर्‍याला जगण्याची उमेद देणे हे काम फक्त देवदूतच करू शकतात. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा सुरेल आत्म्याचा संग लाभला. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही.

किती आठवणी आणि किती हळवे कोपरे आज पोरके झाले !!

Sunday, October 2, 2011

जनलोकपाल आंदोलन

जनलोकपाल आंदोलनाचा धुराळा खाली बसून आता बरेच दिवस झाले आहेत. बारा दिवसाचा एक मोठा सोहळा माध्यमांच्या ढोल ताशाच्या तालावर दणकून साजरा झाला. आता त्याचा विचार करायला ना माध्यमांना वेळ ना 'आम आदमी' ला.

माझ्यापुरता विचार करायचा झाल्यास हे आंदोलन माझ्या पिढीने पाहिलेले सर्वात मोठे जन आंदोलन होते. आम्ही अश्या आंदोनलांबद्दल फक्त इतिहासाच्या पुस्तकांमधुन वाचलेले होते आणि नकळत त्याकाळच्या लोकांबद्दल एक असुया मनात होती की त्यांना आपले नाव इतिहासात कोरायची संधी मिळाली. माझ्यामते अण्णांना तरुणाईचा जो प्रचंड पाठिंबा मिळाला त्यामागे ही सुप्त असुया एक प्रमुख कारण असु शकते.

आंदोलनाबाबत बोलायचे झाल्यास ते एक 'चळवळ' म्हणून नाही तर एक 'प्रकल्प' म्हणून राबवले गेले. एक अतिशय सुनियोजित, आखणीबंद आणि काटेकोर व्यवस्थापन असलेला प्रकल्प. अण्णांच्या त्या बारा दिवसातील प्रतिक्रीया आणि कृती पाहिल्या तर ह्या प्रकल्पाचे व्यवस्थापन किती मुरलेले होते ते स्पष्ट होईल. ह्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकांची पात्रता संशयातित नव्हतीच पण ज्यांच्या विरोधात हे आंदोलन झाले त्यांच्यापेक्षा चारित्र्यवान असल्याचा त्यांना फायदा मिळाला.

माध्यमांनी अण्णांना दुसरे गांधी म्हणून डोक्यावर घेतले आणि मी त्यांच्याशी संपूर्णपणे सहमत आहे. अण्णांकडे खरोखरच गांधीजींचे सर्व गुण आहेत. गांधीजींप्रमाणेच अण्णांचे वैयक्तिक चारित्र्य उत्तुंग पण गूढ आहे. त्यांची अंगकाठी सुद्धा गांधीजींशी मिळती जुळती आहे. ते महात्माजींप्रमाणेच निर्भय आहेत आणि प्रचंड आत्मक्लेश सहन करायला लागणारी आंतरिक शक्ती त्यांच्याकडे आहे. पण ह्याचबरोबर हेकेखोरपणा, आत्मप्रौढी आणि विशिष्ट व्यक्तींना झुकते माप देण्यासारखे महात्माजींचे काही ठळक दोषसुद्धा त्यांच्यात उतरले आहेत.

पण ह्या सगळ्या व्यक्तीपूजेच्या गदारोळात एक प्रश्न सगळ्यांनी नजरेआड केला तो म्हणजे लोकपाल सारखी नवी संस्था अथवा पद निर्माण करण्याची खरच गरज आहे का ? कुठलीही नविन व्यवस्था निर्माण करणे हे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेत सुधारणा करण्यापेक्षा नेहमीच जास्त वेळखाऊ आणि अवघड असते. त्यात सर्व राजकीय पक्षांचा ह्याबाबतीतला उत्साह बघता ह्या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे साक्षात ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही. एखादी व्यवस्था नीट चालत नाही म्हणजे ती व्यवस्थाच चुकीची आहे असे नाही. अशाप्रकारच्या सामाजीक व्यवस्था बहुतेक वेळा कारभार्‍यांमुळे फोल ठरतात. अण्णांच्या सर्व अटी मान्य करूनही जे नविन लोकपाल बनेल त्यामुळे साठ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असे खुद्द अण्णाच म्हणत आहेत. पण हाच परिणाम जर अस्तित्वात असलेल्या व्यवस्था आणि कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करून साध्य होणार असेल तर नविन व्यवस्थेचा खटाटोप कशासाठी ?

ही वेळ झालेल्या चुका सुधारण्याची आहे नविन चुका करण्याची नव्हे.