Tuesday, May 27, 2025

ऑपेरेशन सिंदूर

ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारताने निर्विवाद यश संपादन केले यात तिळमात्र शंका नाही. आपल्या सैन्याने आणि विशेषकरून वायुदलाने ज्या अचूकतेने पाकिस्तानमधले अतिरेकी तळ आणि पाकिस्तानचे हवाई तळ उध्वस्त केले त्याला तोडच नाही. तसेच पाकिस्तानने केलेले सर्व ड्रोन आणि प्रक्षेपास्त्र हल्ले ज्या सफाईने आपल्या हवाई संरक्षण प्रणालीने हाणून पाडले ते कोणाही भारतीयाची मान उंचावणारेच आहे. पाकिस्तानच्या अघोरी कृत्याला आपल्या सैन्याने अतिशय समर्पक पण संयत उत्तर दिले आहे.

बालाकोट नंतर सरकार शहाणे झाले आहे, ह्यावेळी पहिल्यापासूनच त्यांनी व्हिडिओ पुराव्यासकट आपल्या सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती सर्व जगाला दिली. त्यामुळे कुठल्याही विरोधी पक्षाने निदान पुरावे तरी मागितले नाहीत. खरं तर सैन्य कारवाईची पुरावे मागितले जावे हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे पण एकंदरीतच आपल्या देशातल्या सर्व राजकीय पक्षांची बौद्धिक पातळी बघता हे अनिवार्य आहे.

ह्या कारवाईने भारताचे सामरिक सामर्थ्य आपण सुस्पष्टतेने जगासमोर मांडले आहे, पण अजूनही पाकिस्तानच्या अपप्रचाराचा सामना आपण नीट करू शकत नाही हे पण स्पष्ट झाले आहे. ह्याला आपल्या देशाचा अपप्रचार न करण्याचा चांगुलपणा कारणीभूत आहेच पण त्याहूनही जास्त कारणीभूत कोणी असेल तर आपल्या देशातील सर्व माहिती प्रसारण वाहिन्या आहेत. ज्या पद्धतीने सर्व TV वाहिन्या आणि ऑनलाईन माध्यमांनी ऑपेरेशन सिंदूरचे प्रसारण केले ते अतिशय बेजवाबदार आणि हातघाईला येऊन केल्यासारखे होते.

पाकिस्तानने जेव्हा ड्रोन हल्ले सुरु केले त्यावेळी काही TV वाहिन्या 'X' आणि तत्सम ऑनलाईन माध्यमांवर येणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ काहीही शहानिशा न करता जसेच्या तसे दाखवत होत्या. काही TV वाहिन्या पाकिस्तानमधल्या सर्व मुख्य शहरांवर हल्ले करण्यात व्यग्र होत्या. काही धादांत खोट्या बातम्यांमुळे आपल्या सैन्याने जी खरोखर नेत्रदीपक कारवाई केली होती त्यावर शंका घेण्यास पाकिस्तानला आयती संधी मिळाली. ह्या काळात भाजप समर्थकांचा पण इतका उतावळेपणा चालू होता की जणू काही मोदी पाकिस्तानचा संपूर्ण नायनाट करणार हे त्यांनी गृहीतच धरले होते.

आणि अशातच ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आणि कोणालाच काही कळेनासे झाले. ह्या एका बाबतीत पाकिस्तानने बाजी मारली असे म्हणावे लागेल. त्यांच्या सरकार, सैन्य आणि हवाई संरक्षण व्यवस्थेचे वाभाडे पूर्ण जगासमोर उघडे पडले असूनही निकाल त्यांच्या बाजूने लागल्यासारखे भासवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे काँग्रेसने उपस्थित केलेला ह्याबाबतीतला प्रश्न समर्पक आहे. ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मोदी सरकार देऊ शकले नाही ही पण एक वस्तुस्थिती आहे. आपल्या सैन्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू सांभाळायचा प्रयत्न केला पण तरीही काही गोष्टी स्पष्ट झाल्याच नाहीत.

युध्दविरामानंतर अपेक्षेप्रमाणे सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनी आपल्याला सोयीस्कर भूमिका घेतलेली दिसते. सरकार काहीच चर्चा न करण्यावर भर देत आहे तर विरोधी पक्ष सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसनी काही प्रश्न उपस्थित केले पण त्यापैकी अनेक प्रश्न निव्वळ निर्बुद्ध होते. विशेषतः परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या एका विधानाचा विपर्यास करून त्यांना गुन्हेगार ठरवणारी वक्तव्य तर चीड आणणारी होती. "पाकिस्तानने आपली किती विमाने पाडली ?" असा बालिश प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी भारतीय जनतेचा रोष विनाकारण ओढवून घेतला.

विरोधाची धार कमी करण्यासाठी आणि काही प्रमाणात पाकिस्तानच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळांचा घाट घातला. पण इथेही विरोधकांवर कुरघोडी करण्याचाही संधी सरकारने साधली (जे की अनावश्यक होते). काही प्रमुख विरोधी पक्षांचे प्रतिनिधी सरकारने परस्पर घोषित करून टाकले आणि अपेक्षित बिनडोक विरोधी पक्ष अलगद सरकारनी फेकलेल्या जाळ्यात अडकले.

काँग्रेसने तर ह्याचा एवढा मोठा मुद्दा बनवला की आभाळच कोसळले जणू. स्वतःच्या पक्षातील कोणते नेते ऑपेरेशन सिंदूर चालू असताना भारताची बाजू योग्य पद्धतीने मांडत आहेत हे काँग्रेस शीर्ष घराण्याला नक्कीच कळले असावे पण केवळ त्यांचे नाव सरकारने घोषित केले म्हणून इतका गदारोळ करण्याची काहीच गरज नव्हती. शशी थरूर यांनी अलीकडे केलेल्या अनेक विधानांनी काँग्रेस शीर्ष घराण्यात चांगलीच अस्वस्थता होती. त्याचे रूपांतर आता स्पष्ट आकसात झाले आहे. आपल्याच पक्षातल्या एका चांगल्या आणि उपयुक्त नेत्याबद्दल इतका टोकाचा आकस हे शहाणपणाचे लक्षण नाही;  सत्तेमध्ये नसताना तर नक्कीच नाही.

बरं काँग्रेसने आपली जी यादी दिली ती बघून तर काँगेसच्या कट्टर समर्थकांची पण निराशा झाली असेल. आनंद शर्मा आणि तरुण गोगाई वगळता बाकीची दोन नावे कोणाला माहित देखील नव्हती. स्वतः राहुल गांधी किंवा प्रियांका वाड्रा यांचे नाव घोषित करून खरे तर सरकारला कोंडीत पकडता आले असते पण एवढी चाणक्यनीती पक्षात नाही. शशी थरूर आणि मनीष तिवारी यांच्या नावाला विरोध करून काँग्रेस शीर्ष घराण्याने आपल्या मनाचा कोतेपणा देशासमोर उघड केला.

१. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे काय झाले ?

२. युद्धबंदी संदर्भातील अमेरिकेची भूमिका नक्की काय होती ?

ह्या संपूर्ण प्रकरणात सरकारने वरील दोन प्रश्नांची उत्तरे देणे मात्र नक्कीच अपेक्षित आहे. संसदेचे विशेष सत्र भरवून सरकारला याची उत्तरे देता आली असती. आशा आहे की पुढच्या संसद सत्रामध्ये याची समाधानकारक उत्तरे जनतेला मिळतील.

Sunday, October 13, 2024

इंतजार

हम खामोश रहकर उनकी इंतजार मे हैं
और झगड के इन्कार कर के वो बेचैन जैसी

हात बढाकर पीछें खींचना फितरत उनकी
बाहें हमारी अब भी खुली हैं पहले जैसी

मेरी बातें तो सच थी दिन के धूप जैसी
और उनकी घबराहट न छूटी साये जैसी

पता नही क्या अंजाम है इस इंतजार का
धडकन तेज आज भी है पहले जैसी

कयामत

तेरा चेहरा तेरी आँखें
तेरे होंठ तेरी मुस्कान
तेरी खुशबू तेरे गेसूं
तू नहीं जानती
क्या कयामत हो तुम

मेरी तडप मेरी बेचैनी
मेरी बेबसी मेरी आरजूं
मेरी तनहाई मेरे आँसू
तू नहीं जानती
क्या कयामत हो तुम

Monday, June 8, 2020

डाव सर्वस्वाचा

प्रवासालाच घेऊनी पायतळी
कित्येकदा मुक्काम टाळिला होता

उगवतीचे स्वप्न डोळ्यात भरूनी
काळोख रात्रीचा कवटाळिला होता

तिलाही आला माझा कंटाळा
जिच्यावर जीव ओवाळिला होता

वाटले मला तीस कळले असावे
निरोप घेता पाय रेंगाळिला होता

डाव मी लावला शेवटी सर्वस्वाचा
हाय 'त्याने' तोही फेटाळिला होता

Sunday, June 23, 2019

राहूल गांधींचा राजीनामा मंजूर का होत नाही ?

राहूल गांधींनी पुन्हा एकदा आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार नाही हे निक्षून सांगितले आहे आणि अपेक्षेप्रमाणे पार्टीने पुन्हा त्यांना असे न करण्याबद्दल विनवले आहे.

या विनवणीमागे काँग्रेसजनांची अगतिकता तर आहेच पण मला असे वाटते की पार्टीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला या घडीला हे पद नको आहे. म्हणूनच सामूहिक नेतृत्वाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मोठ्या नेत्यांच्या अनुत्सकतेची तीन मुख्य कारणे आहेत.

पहिले कारण सध्याची काँग्रेसची अवस्था. पक्ष आणि कार्यकर्ते सध्या पूर्णपणे खचलेल्या मनस्थितीमधे आहेत. पक्षाचा विस्तार देशभर असला तरीही जमीनपातळीवर कसून कष्ट घेण्याची कोणाचीच तयारी नाही.

दुसरे कारण गमावलेली विश्वासार्ह्यता. आज काँग्रेसची विश्वासार्ह्यता निचांकी पातळीला पोचली आहे. स्वातंत्र्यलढ्यात लक्षणीय बलिदान केलेली काँग्रेस ही आजची काँग्रेस नाही हे सामान्य जनतेला (विशेषतः तरूण पिढीला) कळून चुकले आहे. कुठल्याही नवीन योजनेचा आपल्याला पूर्ण लाभ मिळेल हा विश्वास जनतेत निर्माण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे (उदा. न्याय)

पण तिसरे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे समांतर सत्ताकेंद्राची खात्री आणि भीती. जरी राहूल गांधी अध्यक्षपदावर राहिले नाहीत तरी खरी सत्तासूत्र त्यांच्याच हातात राहणार आहेत. यूपीए १ आणि २ चा अनुभव सगळ्यांना आहेच. केवळ जबाबदारीचे ओझे आपण वाहायचे आणि सत्ता मात्र गांधी घराण्यानी उपभोगायची ह्याला कोणताही मोठा काँग्रेस नेता तयार नाही. जोपर्यंत गांधी घराणे पूर्णपणे राजकारणामधून बाहेर पडत नाही तोपर्यंत फक्त बळीचा बकरा बनण्यात कोणालाही स्वारस्य असेल असे वाटत नाही.

Sunday, June 17, 2018

कॉंग्रेस - एक विश्लेषण

कॉंग्रेसच्या प्रवासाचे तीन प्रमुख टप्पे मला जाणवतात. या तीन टप्प्यांमधील त्यांचे योगदान व चुका ह्या त्यांच्या सध्याच्या परीस्थितीला जबाबदार आहेत.

पहिला टप्पा होता 1947 - 1970. स्वातंत्र्यानंतरचा हा कालखंड माझ्यामते कॉंग्रेसचा सुवर्णकाळ होता. ह्या टप्प्यात कॉंग्रेसला प्रचंड जनाधार लाभला. दुसर्या कुठल्याच राजकीय पक्षाकडे त्यावेळी कॉंग्रेसला पर्याय होऊ शकेल इतकी ताकद नव्हती. अती उजवे आणि अती डावे यांच्यापेक्षा मवाळ मध्यममार्गी कॉंग्रेस जनतेला अधिक भावली. कॉंग्रेसचे तात्कालीन नेतेसुद्धा तत्ववादी आणि स्वच्छ चारित्र्याचे होते. राष्ट्रसेवा, राष्ट्रउभारणी हे प्राधान्यक्रम होते. फाळणीची चूक सरदार पटेलांनी संस्थाने संघराज्यात जोडून बरीचशी पुसून काढली होती. पण कॉंग्रेसने मात्र पटेलांची कदर केली नाही. ज्या प्रमाणात नेहरू घराण्यातली पुढची पिढी 'प्रमोट' केली गेली त्या प्रमाणात पटेलच काय पण खुद्द महात्माजींचे वंशजसुद्धा पुढे येऊ शकले नाहीत. उलट गांधी या नावाच्या प्रभावाचा इतर कोणी उपयोग करू नये म्हणून इंदिराजींनाच 'गांधी' बनवण्यात आले. तरीही स्वातंत्र्याच्या मागेपुढे जन्मलेली पिढी कायम कॉंग्रेस बरोबरच राहिली.

1970 - 1990 ह्या टप्प्यात कॉंग्रेसनी तत्व, चारित्र्य, राष्ट्रसेवा ह्या सगळ्याला तिलांजली दिली. स्वातंत्र्यलढ्यातली पिढी आता पडद्याआड गेली होती आणि पहिल्या टप्प्यात चातुर्यानी पेरलेल्या 'गांधी' आता चांगल्याच डवरून आल्या होत्या. केवळ स्वसंवृद्धी आणि पक्षसंवृद्धी हाच कार्यक्रम राबवला गेला. तत्वहीन, भ्रष्टाचारी वृत्तींचा शिरकाव झाला आणि यातूनच आणिबाणीसारखी घोडचूक घडली. माझ्यामते कॉंग्रेसच्या जनाधाराला गळती लागण्याचे एक प्रमुख कारण आणिबाणी होते. याच काळात सामाजिक पटलावर धुमसणार्या विरोधाला व्यासपीठ उत्पन्न झाले. कॉंग्रेसला प्रथमच पराभव चाखावा लागला आणि कॉंग्रेसला खर्याअर्थी पर्याय देऊ शकेल अशी राजकीय व्यवस्था जन्माला आली.

1990 पासून पुढे. या टप्प्यामधे प्रादेशिक पक्षांनी भलताच जोर धरला होता. आपापल्या राज्यात यांना प्रचंड जनाधार आहे आणि राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावण्याचे स्वप्न असले तरी सध्यापुरते ते आपापल्या राज्यात समाधानी आहेत. पण या प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेस, भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांची चांगलीच कोंडी केली. आघाडी सरकारांचा हा काळ. कॉंग्रेस समविचारी पक्षांना बरोबर घेऊन वाटचाल करत होती पण तरीही स्वःतचा मोठेपणा सतत इतरांवर बिंबवण्याचा मोह काही सुटत नव्हता. आघाडी सरकारची अपरिहार्यता आणि भ्रष्टाचाराकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे कॉंग्रेसचा जनाधार झपाट्याने घटत होता. स्वतंत्र भारतात जन्माला आलेली आजची पिढी कॉंग्रेसबरोबर 'रिलेट'च करू शकली नाही. देशासाठी त्याग केलेली कॉंग्रेस ही नव्हे हे ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. इंटरनेट आणि इतर सोशल मिडीयाच्या माध्यमांमधून दुसर्या देशातील स्वच्छ सरकारे त्यांना स्पष्ट दिसत होती. अशातच एकामागून एक भ्रष्टाचाराचे घोटाळे उघड होऊ लागले आणि जनतेच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला.

भाजपच्या झंझावातापुढे जवळजवळ तीन वर्ष भंजाळल्यासारखी दिसणारी कॉंग्रेस आता जरा पाय रोवून उभी राहताना दिसते आहे. पण जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा कमावणे हे अतिशय अवघड काम आहे. कॉंग्रेसचे आजचे नेतृत्व बघता तर हे काम अशक्यच वाटते. कर्तुत्वहीन घराणेशाहीला आजची पिढी कधीच स्विकारणार नाही हे मान्य करूनच कॉंग्रेसला पुढची वाटचाल करावी लागेल.

Monday, October 30, 2017

जीवनवर्तुळ

"वपु" समजण्यासाठी, आवडण्यासाठी, भिडण्यासाठी वयाची तशी फारशी अट नाही. पण एका विशिष्ट मनस्थीतीमधे त्यांचं लिखाण पटकन मनात घर करून जातं. स्पष्ट सांगायचं तर प्रेमात पडलेला किंवा प्रेमभंग झालेला वपुंच्या नादी लवकर लागतो. अस्मादिक सुद्धा या प्रसंगातून गेलेले असल्यामुळे अशी वपुंच्या नादी लागलेली माणसं पटकन ओळखता येतात.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे त्यावेळी माझी आणि माझ्यासारख्या इतरांची यथेच्च हेटाई करणारा एक मित्र आता तीच सगळी लक्षणं दाखवतो आहे. आजकाल WhatsApp आणि इतर सोशल मिडीयावर एखाद्यानी टाकलेल्या कमेंटस् आणि स्टेटस वरून त्याची मनस्थीती झटकन समजते. काल जो वपु वरून आमची टेष्टा करायचा आज चक्क त्याच्या DP ला वपु ?

एखाद्यावर उद्भवलेल्या परिस्थितीची जेव्हा आपण चेष्टा करतो तेव्हा ती परिस्थिती आपल्यावर येणारच नाही ही जी खात्री आपल्याला असते त्यातला फोलपणा अधोरेखीत झाला.

असो .. आमच्या मित्राच्या आयुष्यातील एक जीवनवर्तुळ पूर्ण झाले.