Sunday, June 23, 2019

राहूल गांधींचा राजीनामा मंजूर का होत नाही ?

राहूल गांधींनी पुन्हा एकदा आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार नाही हे निक्षून सांगितले आहे आणि अपेक्षेप्रमाणे पार्टीने पुन्हा त्यांना असे न करण्याबद्दल विनवले आहे.

या विनवणीमागे काँग्रेसजनांची अगतिकता तर आहेच पण मला असे वाटते की पार्टीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला या घडीला हे पद नको आहे. म्हणूनच सामूहिक नेतृत्वाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मोठ्या नेत्यांच्या अनुत्सकतेची तीन मुख्य कारणे आहेत.

पहिले कारण सध्याची काँग्रेसची अवस्था. पक्ष आणि कार्यकर्ते सध्या पूर्णपणे खचलेल्या मनस्थितीमधे आहेत. पक्षाचा विस्तार देशभर असला तरीही जमीनपातळीवर कसून कष्ट घेण्याची कोणाचीच तयारी नाही.

दुसरे कारण गमावलेली विश्वासार्ह्यता. आज काँग्रेसची विश्वासार्ह्यता निचांकी पातळीला पोचली आहे. स्वातंत्र्यलढ्यात लक्षणीय बलिदान केलेली काँग्रेस ही आजची काँग्रेस नाही हे सामान्य जनतेला (विशेषतः तरूण पिढीला) कळून चुकले आहे. कुठल्याही नवीन योजनेचा आपल्याला पूर्ण लाभ मिळेल हा विश्वास जनतेत निर्माण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे (उदा. न्याय)

पण तिसरे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे समांतर सत्ताकेंद्राची खात्री आणि भीती. जरी राहूल गांधी अध्यक्षपदावर राहिले नाहीत तरी खरी सत्तासूत्र त्यांच्याच हातात राहणार आहेत. यूपीए १ आणि २ चा अनुभव सगळ्यांना आहेच. केवळ जबाबदारीचे ओझे आपण वाहायचे आणि सत्ता मात्र गांधी घराण्यानी उपभोगायची ह्याला कोणताही मोठा काँग्रेस नेता तयार नाही. जोपर्यंत गांधी घराणे पूर्णपणे राजकारणामधून बाहेर पडत नाही तोपर्यंत फक्त बळीचा बकरा बनण्यात कोणालाही स्वारस्य असेल असे वाटत नाही.