Wednesday, November 13, 2013

एव्हरेस्ट रिटायर होतोय !

चंद्रावर पाऊल ठेवणारा पाचवा माणूस कोण?
एव्हरेस्ट सर करणार सदतीसावा गिर्यारोहक कोण?
भारताचे आठवे राष्ट्रपती कोण?
टेस्ट क्रिकेटमधे १०००० धावांचा टप्पा पार करणारा अकरावा फलंदाज कोण?

डोकं खाजवाव लागतय ना? ह्या प्रश्नांच्या उत्तरांमधे सचिनचे मोठेपण दडलेले आहे. सचिनचे बहुतेक विक्रम हे पहिला किंवा सर्वात जास्त या प्रकारामधे मोडतात. त्याचे सगळेच्या सगळे विक्रम कदाचित मोडले जातील पण जसे एव्हरेस्ट म्हटले की एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग आठवतात तसेच क्रिकेट म्हटले की डॉन ब्रडमन आणि सचिनच आठवतील.

अनेकांची त्याच्या कारकीर्दीच्या शेवटाबद्दल तक्रार आहे पण ह्या काहीश्या लांबलेल्या कारकीर्दीमधे त्याने जे काही करून दाखवले आहे त्याची तुलना करणे अशक्यच आहे. अनेक उपटसुंभांनी त्याच्या निवृत्तीबद्दल केलेल्या विशेष टिप्पण्या ऐकल्या की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. माझ्यालेखी सचिन नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेत आला आहे. ज्यावेळी त्याला हे जाणवले की २०-२० साठी सळसळत्या तरूण रक्ताची गरज आहे त्यावेळी तो आपण होऊन त्या क्रीडाप्रकारमधून बाजूला झाला. वन-डेमधेही ज्यावेळी त्याची चपळता कमी झाल्याचे जाणवले त्याक्षणी तो अध्याय त्याने संपवला. टेस्टमधे अजूनही काही योगदान देणे बाकी आहे असे त्याला वाटले असेल म्हणून कदाचित तो आत्तापर्यंत थांबला असेल. कदाचित त्याला खात्री पटली असेल की भारतीय संघाची धुरा सांभाळायला आता नविन खंबीर खांदे तयार झाले आहेत.

अजून एक तक्रार सचिनबद्दल नेहमी ऐकू येते ती म्हणजे तो नेहमी विक्रमांसाठी खेळला देशासठी नाही. पण जर आपण निव्वळ आकडेवारीवर नजर टाकली तरी हे स्पष्ट होईल की भारताच्या असंख्य विजयांमधे त्याचा मोलाचा वाटा आहे. वन-डे मधले त्याचे योगदान तर त्याचा कट्टर शत्रूसुद्धा नाकारू शकणार नाही.


जन पळभर म्हणतील हाय हाय या अटळ सत्यानुसार क्रिकेट, विक्रम सगळेच नेहमीप्रमाणे चालू राहील. स्टेडियम अशीच तुडुंब भरून वाहात असतील पण क्रिकेटरसिकाच्या हृदयात एक जागा कायमच रिकामी राहील.