काल धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वविजयाची गुढी उभारली आणि अवघ्या भारतात एकच जल्लोष झाला. २८ वर्ष ज्या क्षणाची सर्वांनी आतुरतेनी वाट पाहिली तो सोन्याचा क्षण अनुभवण्याचे भाग्य काल १२० कोटी भारतीय जनतेला लाभले.
१९८७ नंतर प्रथमच एक अटीतटीचा अंतिम सामना विश्वचषक स्पर्धेमधे बघायला मिळाला. दोन्ही डावांमधे चढ उतार, हृदयाचे ठोके चुकवणारे क्षण, कधी पडझड तर कधी डावाची उभारणी असा क्रिकेटचा खरा आनंद देणारा खेळ बघून डोळ्याचे पारणे फिटले.
काल एका अद्भुत मंत्रानी भारावल्यासारखा आपला संघ खेळला आणि विजेतेपद जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या तोंडी तोच मंत्र होता "सचिनाय: नम:". संपूर्ण संघानी सचिनला दिलेले वचन पाळले आणि त्याला नववर्षाची नितांतसुंदर भेट दिली ह्याबद्दल सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. सचिनच्या दैदिप्यमान कारकीर्दीमधे कोणतीही उणीव राहू नये हेच लक्ष्य घेउन आपला संघ ही स्पर्धा खेळला.
सचिनचाही ह्या सगळ्या वाटचालीत सिंहाचा वाटा आहे. त्याने स्वत:च्या खेळींमधुन जणू इतरांसमोर एक आदर्शच उभा केला. काल सहकार्यांनी सचिनला खांद्यावरून मिरवले तेव्हा असंख्य क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. विराट कोहली अतिशय समर्पकपणे म्हणाला "ज्या महान खेळाडूने गेली २१ वर्ष तमाम भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे वाहिले त्याला खांद्यावर घेउन मिरवण्याचा दिवस आज आला आहे"
कोणीतरी गमतीमधे म्हणाला त्याप्रमाणे आता २०१२ मधे जगबुडी झाली तरी हरकत नाही. सचिनने विश्वकरंडक उंचावलेला बघितला आणि जीवन धन्य झाले.
गर्वाने फुगलेली छाती आणि पाणावलेल्या डोळ्यांसह , जय हिंद !!